। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या वतीने महामानवाच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील काही गावांमध्ये मध्यरात्री मेणबत्ती प्रज्ज्वलित करून महामानवाला अभिवादन करण्यात आले. काही ठिकाणी सकाळी बुद्ध विहारांमध्ये तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. अलिबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अलिबाग नगरपरिषदेचे गटनेते प्रदीप नाईक, माजी नगरसेवक अनिल चोपडा, वृषाली ठोसर तसेच भारतीय बौध्द महासभा आणि बौद्धजन पंचायत समितीचे आजी-माजी पदाधिकारी, महिला व अनुयायी उपस्थित होते. दरम्यान, अलिबाग नगरपरिषदेच्या कार्यालयातही महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
हजारो अनुयायी चैत्यभूमीकडे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीमध्ये राज्यासह देशभरातील लाखो अनुयायी दाखल झाले. रायगड जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक अनुयायी चैत्यभूमीवर गेले. काही अनुयायी शुक्रवारी सकाळी तर काही अनुयायी दोन दिवस अगोदरच दादरला दाखल झाले होते.