मोदी सरकारचा निषेध, राहुल गांधी यांचा संताप
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
शेतमालाला किमान आधारभूत किंमत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकर्यांनी ‘चलो दिल्ली’ म्हणत आंदोलन पुकारले. पण, शेतकर्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आपल्या मागण्या मांडण्यासाठी आणि आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी शेतकर्यांना दिल्लीत यायचे आहे. पण, तुम्ही त्यांच्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडताय आणि वेगवेगळ्या मार्गाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताय, हे निषेधार्ह आहे. सरकारने शेतकर्यांच्या मागण्या आणि समस्या गंभीरतेने समजून घेतल्या पाहिजे, असे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे.
देशात आज प्रत्येक तासाला एक शेतकरी आत्महत्या करत आहे. यावरून शेतकर्यांच्या वेदनांचा अंदाज येऊ शकतो. मोदी सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे यापूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान 700 हून अधिक शेतकर्यांनी बलिदान दिले. त्यांचे बलिदान देश विसरणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.
आम्ही शेतकर्यांची पीडा जाणतो आणि त्यांच्या मागण्यांचे समर्थन करतो. एमएसपीला कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेती खर्चाच्या 1.5 पट एमएसपी, कर्जमाफीसह सर्व मागण्यांवर सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. संसदेच्या अधिवेशनात या, अदानींच्या चौकशीला घाबरू नका, असा टोला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लगावत पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.