उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण घरकुलामुळे माणगाव तालुका राज्यात अग्रेसर
| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका घरकुल योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यात अग्रेसर ठरत आहे. राज्य शासनाने प्रधानमंत्री जनमन आवास योजना व रामाई घरकुल योजना यांसारख्या योजनांद्वारे गोरगरिबांना निवारा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. तालुक्यात 74 ग्रामपंचायती असून, घरकुलासाठी 2053 लाभार्थांचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी 1918 पात्र लाभार्थी ठरविण्यात आले. तर 135 ऑनलाईन अपात्र लाभार्थी ठरविण्यात आले. यामधून 1379 घरकुलाला मंजुरी देण्यात आली. पैकी 329 घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित 1050 घरकुले प्रगती पथावर आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातच नव्हे तर, राज्यात माणगाव तालुका घरकुल योजनेत अग्रेसर ठरला असून, या घरकुलांमुळे अनेकांच्या स्वप्नांची दारे उघडली आहेत.
माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी लोकसहभाग आणि स्थानिक रोजगाराच्या पलीकडे जाऊन ‘आपलं घर, सुंदर घर’ ही संकल्पना या तालुक्यात राबवत घरकुल योजना केवळ निवार्याचे साधन नाही, तर ती तालुक्यातील लोकांना रोजगार देणारी संधीही ठरली आहे. माणगाव तालुक्यातील घरकुल योजनेमध्ये ठेकेदारामार्फत न बांधता, संबंधित लाभार्थ्यांनी स्वतःचं घर स्वतःच बांधायचं असा कानमंत्र देत ही घरे सहभागातून उभी केली. लाभार्थ्यांना बांधकाम साहित्य खरेदीत येणार्या अडचणी कौशल्याने सोडवत, त्यांना बांधकाम साहित्य वेळोवेळी पुरविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आज माणगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हजारो गरजू कुटुंबे कच्च्या घरांमध्ये राहतात. पावसाळ्यात गळणारी झोपडी, उन्हाळ्यात तापणारी कौलारू टिनाची छपरे किंवा वादळात उडणार्या झोपड्यांपासून मुक्तता झाल्याने त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडविण्यासाठी माणगाव पंचायत समितीने टाकलेलं हे एक सकारात्मक पाऊल आहे. या घरांमुळे मुलांच्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
माणगाव तालुका आता घरकुल योजनांच्या माध्यमातून राज्यासह अन्य तालुक्यांसाठी आदर्श ठरत आहे. या योजनेमुळे केवळ माणगाव नव्हे, तर संपूर्ण राज्याचा विकास साधता येईल, अशी स्थानिक लोकांची भावना आहे. माणगाव तालुक्यातील घरकुल योजनांची ही यशस्वी वाटचाल माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. जठार यांनी केलेले योग्य नियोजन तसेच ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, कर्मचारी यांना विश्वासात घेऊन शासकीय वेळे व्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशीही लोकसेवकांची जबाबदारीचे धडे त्यांच्यात रुजवत लाभार्थी ग्रामस्थांच्या लोकसभागातून आणि प्रशासनाचा पारदर्शक दृष्टिकोन यामुळे अनेकांच्या स्वप्नातली घरे पूर्ण झाली त्याचा आनंद आजही लाभार्थी कुटुंबाच्या चेहर्यावर दिसून येत आहे.
जिल्हानिहाय बांधलेली घरे
रायगड 706, पालघर 650, यवतमाळ 245, नांदेड 128, नाशिक 96, गडचिरोली 83, रत्नागिरी 65, ठाणे 48, सातारा 21, अमरावती 20, पुणे 11, वर्धा 11, चंद्रपूर 10, अहमदनगर 3, सिंधुदुर्ग 0, कोल्हापूर 0.
रायगड जिल्ह्यातील घरकुले
जिल्ह्यात एकूण 706 घरकुले बांधून पूर्ण झाली. त्यांपैकी माणगाव 329, सुधागड 62, मुरुड 48, तळा 45, कर्जत 43, अलिबाग 31, पनवेल 31, पेण 22, रोहा 21, महाड 21, पोलादपूर 19, श्रीवर्धन 13, उरण 11 म्हसळा 7, खालापूर 3 घरकुलांचा समावेश आहे.
शासनाची प्रधानमंत्री जनमन आवास योजना ही आदिवासी वंचित गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून कमी वेळात लाभार्थांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात सकारात्मक दृष्टीकोनातून काम चालू आहे. त्यामुळे लाभार्थांना निवार्याची सोय झाली आहे. माणगाव पं. स. गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकार्यांनी उत्तम नियोजन करून ही योजना प्रभावी राबविली. या योजनेमुळे आदिवासींच्या सर्वांगीण उन्नतीत होईल
प्रियदर्शनी मोरे,
प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा रायगड