एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत घेणे मोठी चूक

शरद पवारांनी कबुली दिल्याचा सतीश पाटील यांचा दावा

| मुंबई | प्रतिनिधी |

कधीकाळी भारतीय जनता पक्षात असलेले एकनाथ खडसे पक्षातंर्गत राजकारणास कंटाळले होते. जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या वादानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला होता. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी प्रवेश दिला होता. त्यानंतर विधान परिषदेवर आमदार केले होते. आता खडसे पुन्हा भाजपात जात आहेत. यामुळे खडसे यांना राष्ट्रवादी पक्षात घेणे, ही आपली मोठी चूक असल्याचे शरद पवार यांनी मान्य केल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले. पुण्यातील बैठकीत शरद पवार यांनी चुकीची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलताना डॉ. सतीश पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला आम्ही विरोध केला होता. त्यांना घेऊन पक्षाच्या काहीच फायदा होणार नाही, हे आम्ही शरद पवार यांना सांगितले होते. तसेच त्यांना आमदारकी देण्याऐवजी पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना आमदार करावे, असेही म्हटले होते. खडसे बाबत घेतलेला हा निर्णय म्हणजे आपली मोठी चूक होती, हे पवार साहेबांनी आता मान्य केल्याचे सतीश पाटील यांनी सांगितले.

एकनाथ खडसे दिल्लीला का गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी कोणाच्या भेटी घेतल्या या सर्व बाबी आता समोर आल्या आहेत. एकनाथ खडसे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक केली आहे, असा चिमटा डॉक्टर सतीश पाटील यांनी घेतला.

Exit mobile version