। मुंबई । प्रतिनिधी ।
निवडणुकीत पराभूत झालेल्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य करता येत नाही असा नियम पुढे करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार राजू शेट्टी,नितीन बानुगडे,सचिन सावंत यांच्या नावाला विरोध दर्शविला आहे.
प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी रात्री राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी कोश्यारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याबाबत तथ्य तपासून माहिती घेत आहोत. खरोखर असा नियम असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
यामध्ये एकनाथ खडसे, सचिन सावंत, प्रा. यशवंत भिंग, नितीन बानुगडे आणि खासदार राजू शेट्टी यांच्या नावावर आक्षेप असल्याचे समोर आले आहे. राजू शेट्टी आणि एकनाथ खडसे यांची नावे राष्ट्रवादीने तर नितीन बामुगडे शिवसेनेकडून आणि सचिन सावंत काँग्रेसकडून सुचविण्यात आलेली आहेत.राजू शेट्टी यांनी सन 2014 मध्ये शिवसेना -भाजप युतीला पाठिंबा दिला होता.तर 2019 मध्ये ते स्वतंत्र लढले.एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वीच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.या दोघांना विधानपरिषदेत प्रवेश मिळू नये म्हणूनच भाजपनेच राज्यपालांमार्फत नियमांचा अडसर घातला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
भाजपची टीका
यावरून आता पुन्हा एकदा भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीवरून टिप्पणी केली आहे. आता राज्यपालांकडे 12 आमदारांसाठी मुख्यमंत्री गेले असतील, तर ते राज्याचं दुर्भाग्य आहे. असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.