। कर्जत । प्रतिनिधी ।
ज्यांचे वार्षिक उत्पन्न खूपच कमी आहे, त्यांना दारिद्रय रेषेत नमूद करून त्याप्रमाणे पिवळे रेशन कार्ड दिले जाते. तसेच, शासनाच्या अनेक योजनेचा लाभ त्यांना मिळतो. मात्र, यापूर्वी सन 2005 मध्ये सर्व्हे झाले असताना त्यानंतर आजतागायत 20 वर्षे होण्यास आली तरी नव्याने सर्व्हे केला नसल्याने कर्जत तालुक्यातील व कर्जत शहरातील अनेक कुटुंबं दारिद्रयरेषेखालील लाभार्थी म्हणून वंचित राहिली आहेत. तरी, तात्काळ नव्याने सर्व्हे करून गोरगरीब कुटुंबाला न्याय द्या, अन्यथा शासनाच्या या गलथान कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांनी दिला आहे.
निवडणुकीच्या अगोदर म्हणजे दर पाच वर्षांनी दारिद्रयरेषेखालील सर्व्हे होणे अपेक्षित आहे. यातील लाभार्थींची संख्या वाढली की घटली तसेच नवीन यादी तयार करणे, त्यात नावे समाविष्ट करणे, हे महत्त्वाचे काम 2005 नंतर कर्जत तालुक्यात झाले नाही. त्यामुळे गोर गरीब, आदिवासी, नाका कामगार, असे अनेक लाभार्थी कुटुंबे वंचित राहिली आहेत. याबाबत अमोघ कुळकर्णी यांनी कर्जत तहसील कार्यालयाचे पुरवठा विभागाचे अधिकारी रवींद्र दळवी यांच्याशी चर्चा केली असता, आम्हाला वेळ नाही, ज्यांची नावे टाकायची असतील त्यांना अर्ज द्यायला सांगा, तुमची कामे करायला बसलो का? इतरही कामे असतात, अशी उडवाउडवीची व उद्धट उत्तरे लाभार्थ्यांना देत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशी उद्धट भाषा वापरली जात असल्याने अमोघ कुळकर्णी यांनी निवेदन देऊन त्वरित पुरवठा अधिकारी यांच्यावर कारवाई करा, अन्यथा उपोषणाला सामोरे जा, असा इशाराही निवेदनात दिला आहे.