रवींद्र कुमार यांचे बागायतदारांना मार्गदर्शन
| चौल | प्रतिनिधी |
नारळप्रक्रियेतून लघुद्योगाची उभारणी करणे शक्य असून, बागायतदार शेतकर्यांनी मिळालेल्या संधींमध्ये विविध आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नारळ विकास मंडळाचे डेप्युटी डायरेक्टर रवींद्र कुमार यांनी केले. नारळ विकास मंडळ ठाणे आणि कृषक कल्याणकारी संस्था, चौल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (12 जानेवारी) चौल-सागमळा येथील श्रीराम मंदिरात नारळ विकास मंडळाचा 45 वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी रवींद्र कुमार यांच्यासह नारळ विकास मंडळ टेक्निकल असिस्टंट विपीन सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मंडळ अधिकारी सूर्यवंशी कृषी विभाग, कृषक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, सागमळा गावचे प्रमुख राजेंद्र ठाकूर उपस्थित होते. यावेळी पत्रकार अभय आपटे, चौलमळा गावचे प्रमुख रवींद्र घरत, वामन घरत, प्रभाकर नाईक, अनंत घरत, जनार्दन नाईक, सुशील नाईक, एस.पी. ठाकूर, विजय ठाकूर, विलास शिवलकर, सुधाकर नाईक, नितीन नाईक आदींसह चौल पंचक्रोशितील शेकडो बागायतदार उपस्थित होते. या सोहळ्याचे उद्घाटन नारळ विकास मंडळाचे डेप्युटी डायरेक्टर रवींद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. रवींद्र कुमार यांनी नारळ स्थापना दिनाचे महत्त्व, विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. नारळाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवून नारळाच्या प्रत्येक घटकापासून बनवलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या वाढत्या मागणीवर प्रकाश टाकला आणि बागायतदार शेतकर्यांना या संधींमध्ये विविधता आणण्याचा विचार करण्यास प्रोत्साहित केले.
दरम्यान, नारळ विकास मंडळाचे टेक्निकल असिस्टंट विपीन सर यांनी नारळावरील रोग व त्यावर उपाय यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, कृषक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी नारळ बागायतदारांच्या समस्या व काळाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे बागायतदारांना प्रत्यक्षात काम करीत असताना येणार्या अडीअडचणी, नारळ पाडण्यासाठी मजुरांची वानवा, यावर प्रकाशझोत टाकत, या समस्या तात्काळ सोडविणे गरजेचे असल्याचे सांगून शासनाच्या कृषी विभाग आणि नारळ विकास मंडळाने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. यावेळी कृषी विभागाचे मंडळाधिकारी सूर्यवंशी यांनी नारळ लागवड, बागायतदारांचे प्रश्न, येथील बागायतदाराचे क्षेत्र कमी असल्याने त्याला शासनाच्या निकषानुसार नुकसानीसह विमा योजना मिळण्यासही होणार्या अडचणी याचबरोबर बागायदारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. त्याचबरोबर रवींद्र पाटील यांनी नारळाचे मूल्यवर्धन, नारळाच्या प्रताप जातीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बागायतदार अनंत घरत यांनीदेखील आपले विचार मांडले. कार्यक्रमादरम्यान चौलमळा येथील वामन घरत आणि अनंत घरत यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल, तर पत्रकारितेसाठी राकेश लोहार यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव प्रकाश पाटील यांच्यासह संस्थेच्या सभासदांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिता पाटील व प्रकाश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण मधुकर नाईक यांनी केले.