। कल्याण । प्रतिनिधी ।
दुचाकी चोरी करणार्या दोन सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी उल्हासनगर येथून अटक केली असून त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.
मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे घडत असल्याने हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी विशेष मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी मानपाडा ठाणेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करून त्यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेश व सुचनांप्रमाणे मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक तपास करीत असतांना आरोपींबाबत सहायक पोलीस निरिक्षक संपत फडोळ यांना बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी प्राप्त झाली.
मिळालेल्या गोपनिय बातमीदाराच्या आधारे संपत फडोळ व गुन्हे प्रकटीकरण पथक असे उल्हासनगर येथे रवाना होऊन अहोरात्र मेहनत घेऊन सराईत आरोपी रितिक बाविस्कर (19) आणि कुणाल नायडु (19) यांना उल्हासनगर येथून ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. त्यांच्याकडून मानपाडा पोलीस ठाणे, कोळसेवाडी पोलीस ठाणे व एनआरआय पोलीस ठाणे, नवी मुंबई येथील एकूण चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. या अटक आरोपींकडून चोरी झालेल्या चार दुचाकी असा एकूण रक्कम 2 लाख 70 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अटक आरोपी हे सराईत दुचाकी चोर असून यापुर्वी ठाणे आयुक्तालयात आरोपीत कुणाल नायडु यास एकूण दोन गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. या कारवाईत मानपाडा पोलीस स्टेशन, कोळसेवाडी आणि एनआरआय पोलीस स्टेशन येथील 4 गुन्हे उघडकीस आले आहेत.