। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाणे शहरातील गजबजलेल्या श्रीनगर परिसरातील नित्यानंद लॉण्ड्रीला सोमवारी (दि.13) पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कपडे, फर्निचरसह लाखोंचे नुकसान झाले. या आगीची झळ व धुराचे लोट गंगाविहार सोसायटीत सर्वत्र पसरल्याने एकच हाहाकार उडाला होता. सुदैवाने 250 जणांचे प्राण वाचले आहेत. तसेच, लॉण्ड्रीमधील तीन मोठे गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
ठाणे शहरातील गंगाविहार ही चार मजली इमारत असून तेथील तळमजल्यावर 3500 चौरस फूट जागेत नित्यानंद ही मोठी लॉण्ड्री आहे. या इमारतीमधील प्रत्येक मजल्यावर 12 कुटुंबे राहतात. पहाटे 5 च्या सुमारास अचानक इमारतीमधून धूर येऊ लागल्याने झोपेत असलेल्या रहिवाशांना ठसका लागला. अनेकांना श्वास घेणेही कठीण झाले. आग वाढत असल्याचे बघून अनेक रहिवासी घराबाहेर पळाले. तर, काहींना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
नित्यानंद लॉण्ड्रीला लागलेल्या आगीमध्ये इस्त्री, लाकडी कपाटे, कपडे, वायरिंग सारे काही जळून खाक झाले आहे. तसेच, लॉण्ड्रीमध्ये तीन मोठे गॅस सिलिंडर होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून हे सिलिंडर आगीच्या वेढ्यातून बाहेर काढले.