नागाव बंदर येथे जलशुध्दीकरण केंद्र
| अलिबाग | प्रतिनिधी |
नागावला उमटे धरणातून पाणीपुरवठा होतो. परंतु, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची भीती निर्माण झाली होती. गावांतील नागरिकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी जलशुध्दीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागाव बंदरावर जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. उमटे धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई वाढत चालली आहे. प्रत्येक नागावकरांना सुरक्षित आणि स्वच्छ पाणी देणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे निधी उपलब्ध होताच नागावच्या प्रत्येक विभागात अशा एकूण दहा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी केले.
अलिबाग तालुक्यातील नागाव बंदर येथे गुरुवारी (दि.19) जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, ग्रामपंचायत सदस्य निकिता पाडेकर, कल्पना काठे, मंगल नागे, सामाजिक कार्यकर्ते सचिन राऊळ, ग्रामविकास अधिकारी श्वेता कदम आदी मान्यवरांसह ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, पंच मंडळी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जलशुध्दीकरण हा प्रकल्प पूर्णपणे स्वयंचलित आहे. गावातील नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी ही एक महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक खोलीचे संपूर्ण बांधकाम सचिन राऊळ यांनी केले. बाह्य परिसरातील मार्गसुविधा प्रितेश घरत यांनी करून दिली.
जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी हर्षदा मयेकर यांनी सांगितले की, गावात या आधीपासून जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यरत आहे. आज दुसऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले, पण इतक्यावर थांबता येणार नाही. गावातल्या महिलांना समाधानाने पाणी भरताना पाहते. तेव्हा जाणवते की, स्वच्छ पिण्याचे पाणी हे फक्त सुविधा नाही, तर गरज आहे. हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या सक्रिय सहभागातून तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीपणे पूर्ण झाला असून, गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे, असे हर्षदा मयेकर म्हणाल्या.





