जगदीश गायकवाडला रुग्णालयात कोठडी

| नेरळ-वेणगाव | वार्ताहर |

युवक मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या रिपाई नेता जगदीश गायकवाड याला कर्जत पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. चार दिवसांपूर्वी त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. पण प्रकृतीच्या कारणास्तव त्याला कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याचा ताबा पुन्हा कर्जत पोलिसांकडे देण्यात आला आहे. रुग्णालयात राहून जामीन घेण्याचा गायकवाड याचा डाव सरकारी वकील ननावरे व फिर्यादी सुशिल जाधव, हरेश गायकवाड यांचे वकील कैलास मोरे यानी हाणून पाडला. न्यायालयाने जगदीश गायकवाड याला रुग्णालयातून सोडत नाहीत तोपर्यंत तेथेच बंदिस्त ठेवण्याचे आदेश दिले. तसेच त्याला ठोठावण्यात आलेली पोलीस कोठडीही कायम ठेवली.

कर्जत पोलिसांचे एक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचे पथक तैनात असून कोणत्याही खासगी व्यक्तींना गायकवाड यांना भेटू दिले जात नाही. मात्र सर्व आरोपींना पकडले गेले या प्रकरणात जगदीश गायकवाड यांना जामीन मिळण्याची शक्यता कमी होती. तरी देखील तीन डिसेंबर रोजी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद करीत तब्बल तीन तास सुनावणी झाली आणि त्यानंतर न्यायालयाने जगदीश गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी नाकारली. आरोपी न्यायालयात असल्याने कर्जत पोलीस यांना त्यांची कोणतीही चौकशी करता आली नाही आणि त्यामुळे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी नाकारली.

त्यावेळी न्यायाधीशांनी निर्णय देताना संबंधित प्रकरणातील सर्व आरोपी यांना लवकरात लवकर पकडण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. जोवर जगदीश गायकवाड यांना डॉकटर रुग्णालयातून सोडत नाहीत, तोवर पोलीस कोठडी कायम ठेवण्यात येईल आणि त्यानंतर पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाताना पोलिसांना सहकार्य करावे लागेल, अशी सूचना न्यायालयाने आरोपी पक्षाच्या वकिलांना केली. त्यामुळे पुढील काळात जगदीश गायकवाड यांचा मुक्काम रुग्णालयात असला तरी त्यांची पोलीस कोठडी कायम आहे. पोलीस कोठडीतच जगदीश गायकवाड यांची चौकशी होणार हे आता जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे त्याची पोलीस कोठडी कायम ठेवली असून त्यांना तूर्तास तरी सुटकेचा दिलासा न्यायालयाने दिलेला नाही.

Exit mobile version