| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला हा मंगळवार दि.26 मेपासून बंद करण्यात येणार आहे. नियमानुसार समुद्राला येणारे वादळीवारे व लाटांचा वाढता जोर पाहता पर्यटकांच्या सुरक्षेला मेरीटाईम बोर्डाने जंजिरा किल्ला बंद करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या शनिवार-रविवारी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक अलोट गर्दी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जंजिरा किल्ला पहाण्यासाठी राज्यभरातून हजारो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची किल्ल्याच्या प्रवेश द्वारजवळ मोठी गर्दी होते. त्यातच पावसाळा जवळ आल्याने लाटांचा प्रवाह वाढल्याने शिडाच्या बोटी हेलकावे घेत असल्याने किल्ल्यावर उतरणे देखील जिकरीचे झाले होते. सध्या किल्ल्यावर तिकीट घेण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. त्यातच आता मंगळवार दि.26 मेपासून जंजिरा किल्ला पुढील तीन महिने बंद राहणार असून, सप्टेंबर महिन्यात पुन्हा या किल्ल्याची दालने उघडणार आहेत. त्यामुळे येत्या शनिवार-रविवारी किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिडाच्या बोटीवर काम करणाऱ्यांना हा शेवटचा रोजगार असून, तद्नंतर त्यांना तीन महिने घरीच बसावे लागणार आहे. म्हणून जास्ती जास्त पर्यटकांना किल्ल्यात नेण्याचा पर्यत्न शिडाच्या बोटीधारकांकडून केला जात आहे.
जंजिरा किल्ला ‘या’ तारखेपासून बंद
