जंजिरा मुक्ती संग्राम दिन

शासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत

| म्हसळा | प्रतिनिधी |

स्वातंत्र्योत्तर भारताच्या एकीकरण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरलेला जंजिरा संस्थानाचा भारतात विलिनीकरणाचा दिवस दि. 31 जानेवारी 1948, आजही शासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. या ऐतिहासिक दिनास ‘जंजिरा मुक्ती संग्राम दिन’ म्हणून शासकीय पातळीवर साजरा करण्यात यावा, अशी मागणी रायगड प्रेस क्लब सह मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा तालुका प्रेस क्लबची आहे. या संदर्भातील निवेदन रायगड जिल्हाधिकारी यांना नुकतेच सादर करण्यात आले आहे.

दि. 31 जानेवारी 1948 रोजी तत्कालीन जंजिरा संस्थानिक (नवाब) यांनी भारत सरकारसोबत Instrument of Accession वर स्वाक्षरी केल्यानंतर जंजिरा संस्थान स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग बनले. या कालावधीत 29 जानेवारी 1948 ला म्हसळा महाल कचेरीचा ताबा मोहनधारिया, नानासाहेब पुरोहीत, बापूसाहेब देशपांडे, हरीभाऊ भडसावळे, केशव खांबेटे वगैरे एक हजार ते दोन हजार सैनिकानी घेतल्याची नोंद मुंबई प्रांताचा तत्कालीन पंतप्रधान बाळासाहेब खेर यांच्याकडे गेली होती.

या सर्व घटनाक्रमामुळे जंजिरा संस्थानाची स्वतंत्र सत्ता समाप्त होऊन भारतीय संघराज्यात त्याचे अधिकृत विलिनीकरण झाले. ही घटना केवळ रायगड जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर एकीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या ऐतिहासिक पार्श्वभूमीची दखल घेत, गेल्या पंधरा वर्षांपासून रायगड प्रेस क्लब व तत्कालीन जंजिरा संस्थानातील मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जंजिरा मुक्ती संग्राम दिन स्थानिक पातळीवर साजरा केला जातो. मात्र, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सप्टेंबर (दि. 17) प्रमाणेच जंजिरा मुक्ती संग्राम दिनालाही शासनाने अधिकृत मान्यता द्यावी व शासकीय स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या दिनास शासकीय मान्यता मिळाल्यास, रायगड जिल्ह्याच्या समृद्ध इतिहासाला योग्य तो सन्मान मिळेल, तसेच नव्या पिढीला स्थानिक इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व समजण्यास मदत होईल, असे मत पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रायगड यांचेजवळ व्यक्त केले.

Exit mobile version