जंजिर्‍याचा प्रवास होणार सुखकर

पायलिंग जेट्टीच्या कामाला सुरुवात

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड येथील जंजिरा व पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक हजेरी लावतात. परंतु, ओहोटीच्या वेळी बोटी सध्याच्या वापरात असणार्‍या खोरा जेटीवर लागत नसल्याने पर्यटकांना ताटकळत राहावे लागते. ही बाब स्थानिक पत्रकारांनी मेरिटाईम बोर्डाच्या निदर्शनास आणून दिली होती. दरम्यान, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी नऊ कोटी रुपये खर्चून 150 मीटर लांबीची पायलिंग जेट्टी उभारण्यात येणार असून, तिचे कामदेखील सुरू झाले आहे. ओहोटीच्या वेळीही बोटी या जेट्टीला लागणार आहेत, त्यामुळे पर्यटकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.


दरम्यान, जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी राजपुरी, खोरा बंदर, दिघी या तीन जेट्टींवरुन बोटींची जलवाहतूक होते. त्यातील खोरा बंदर जेट्टी मुरुड शहरापासून जवळ असल्याने पर्यटक किल्ल्यात जाण्यासाठी खोरा जेट्टीचा वापर करतात. परंतु, ही जेट्टी जुनी असून, तिची लांबीदेखील कमी असल्याने ओहोटीला बोटी जेटीला लागत नाही व त्यामुळे पर्यटकांना किल्ल्यात जाता येत नाही. म्हणून मेरीटाईम बोर्डाने खोरा बंदरात नऊ कोटी खर्च असलेली नूतन जेट्टी मंजूर केली आहे. या जेट्टीमुळे कितीही ओहोटी असली तरी प्रवासी बोटी जेट्टीला लागतील व प्रवाशांना चढणे-उतरणे सोपे होणार आहे.

खोरा बंदरात 2019 साली मेरीटाईम बोर्डाने 1 कोटी खर्च करून 400 वाहने पार्किंग होतील असे भव्य पार्किंग बनवले. 2020 च्या सुरुवातीला काम पूर्ण झाले. परंतु आज तीन वर्षे झाली त्या पार्किंगमध्ये एकही गाडी पार्क झाली नाही. तीन वर्षात पार्किंगमधून शासनाला कोटी रुपये उत्पन्न मिळाले असते; परंतु टेंडर न झाल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला. मुरुड पत्रकारांनी खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे तक्रार केल्याने 18 मार्च रोजी खोरा बंदर पार्किंग टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजते. परंतु, टेंडर कोणाला मिळाले, याबाबत माहिती मिळाली नाही.

खोरा बंदरातील नूतन जेट्टीचे काम सुरु झाले असून, समुद्रातील खडक टेस्टिंगचे काम सुरू असल्याने पार्किंगच्या अर्ध्या जागेत जेट्टीच्या कामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मे महिन्यात पर्यटकांची संख्या वाढल्यावर पार्किंगची जागा कमी पडणार आहे. त्याची सोय करणे गरजेचे आहे.

Exit mobile version