। तळा । प्रतिनिधी ।
जापनीज इन्सेफेलाइटिस (जेई) या गंभीर आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअनुषंगाने तळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांना ही लस देण्यास सुरुवात झाली आहे. हा आजार जापनीज इन्सेफेलाइटिस विषाणू आणि संसर्गित डासांद्वारे पसरतो. त्यामुळे बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रायगड, पुणे आणि परभणी जिल्ह्यांमध्ये 1 ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना 1 मार्चपासून लसीकरण दिले जात आहे. मोहिमेअंतर्गत सुरुवातीला सर्व मुला-मुलींना एकच डोस दिला जाईल. त्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत 9 ते 12 महिन्यांच्या बालकांना पहिला डोस आणि 16 ते 24 महिन्यांच्या बालकांना दुसरा डोस दिला जाणार आहे. या लसीकरण कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर, सुनील बैकर, मित्तल वावेकर, वर्षा माडी, गोकुळ निकम यांसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.