। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन शहरामध्ये मागील महिन्याभरापासून एका रानडुकराचा वावर असल्याची चर्चा होत आहे. तसेच, हे रानडुक्कर चांगलेच मोठे असून एका म्हशीच्या वासरा एवढे दिसायला आहे, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
श्रीवर्धन शहरातील आगर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात नारळ, सुपारीच्या व केळीच्या बागा आहेत. या बागांमध्ये दिवसा पाणी लावण्याच्या निमित्ताने किंवा साफसफाईच्या निमित्ताने माणसांचा वावर असतो. परंतु, रात्रीच्या वेळी हा भाग पूर्णपणे निर्मनुष्य असतो. अशाच वेळी हे रान डुक्कर या भागांमध्ये फिरत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आगर विभागासह समुद्रकिनारी असलेल्या ओसाड शेतीमध्ये देखील रानडुक्करांचा नियमितपणे वावर असल्याचे बोलले जात आहे. तसेच, अनेक नागरिकांनी अंधारात रानडुक्करांना रस्ता ओलांडताना देखील पाहिलेले आहे. या रानडुकरांनी येथील वाड्यांमध्ये खड्डे खणल्याचे निदर्शनास आले असून, त्या ठिकाणी त्यांच्या पायांच्या खुणा देखील आढळून येत आहेत. त्यामुळे श्रीवर्धन शहरातील रानडुक्करांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने या रानडुक्करांची लवकरात लवकर शोध मोहिम हाती घेऊन त्याला पकडण्यात यावे, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.