शिक्षण मंडळाच्या नियमांचे तीनतेरा
। पनवेल । वार्ताहर ।
शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अतयंत महत्त्वाची समजली जाणारी दहावीची परीक्षा सुरू असताना, दुसरीकडे बारावीच्या 28 फेब्रुवारीला पार पडलेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेंचा अख्ख्या संचच रस्त्यावर सापडल्याने पालकवर्गासह शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. अतिशय कडक बंदोबस्तात एका केंद्रावरुन दुसर्या केंद्रावर नेण्यात येणार्या या उत्तरपत्रिका रस्त्यावर सापडल्याच कशा? यामागचे गौडबंगाल काय? त्यांचा गैरवापर तर झाला नसेल ना? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे मनसेच्या जिल्हा सचिव स्नेहल बागल यांनी सांगितले. कामोठे वसाहतीत बारावीच्या उत्तरपत्रिकेंचा अख्खा संचच रस्त्यावर सापडला असून, 28 मार्च रोजी पार पडलेल्या परीक्षेच्या या उत्तरपत्रिका आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनसेच्या जिल्हा सचिव स्नेहल बागल यांना गुरुवारी (दि. 6) सकाळी कामोठे बसस्थानकाच्या मागे एक पिशवी सापडली. त्यात त्यांना बारकोडसह बारावी अर्थात एचएससी बोर्डाच्या उत्तरपत्रिका असल्याचे निदर्शनास आले. बागल यांना हा संच सापडल्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी मनसेच्या जिल्हाध्यक्षा आदिती सोनार, महानगराध्यक्षा स्वरूपा सुर्वे यांना दिली. त्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यात भेट देऊन सापडलेल्या उत्तरपत्रिका त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. ऐन परीक्षा काळात घडलेल्या या प्रकारामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेकडून करण्यात येणार असल्याची माहिती महिला आघाडीच्या प्रमुख आदिती सोनार यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कामोठे येथे राहणार्या एका शिक्षकाकडून हे पेपर गहाळ झाले असल्याची माहिती संबंधित शिक्षकाकडून मुंबई विद्यापीठाला देण्यात आल्याचे समजले. बारावी कॉमर्सच्या बुक किपिंग विषयाच्या या उत्तरपत्रिका आहेत.
पोलिसांकडून पंचनामा
पोलिसांनी या उत्तरपत्रिकांचा पंचनामा केल्यानंतर त्या आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. या उत्तरपत्रिकांवरील बारकोडवरुन त्या नेमक्या कोणत्या केंद्राच्या आहेत आणि त्या रस्त्यावर कशा आल्या? याबाबतचा खुलासा होऊ शकेल, असे स्नेहल बागल यांनी स्पष्ट केले. या उत्तरपत्रिकेंचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बोर्डाचा कारभार चव्हाट्यावर
ऐन परीक्षेच्या काळात घडलेल्या या प्रकारमुळे बोर्डाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, राज्यात शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत किती निष्काळजी आहे याची प्रचिती आपल्याला यामुळे पाहायला मिळाली.
तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शाळेमध्येच तपासून त्या बोर्डाकडे सादर करणे बंधनकारक असते. परंतु, कामोठे येथील रस्त्यावर उत्तरपत्रिका सापडण्याची घटना दुर्दैवी आहे. पनवेल येथील सत्याग्रह शाळा आणि तपासणीस शिक्षक यांचा हा हलगर्जीपणा आहे. उत्तरपत्रिकांचा पूर्ण संच पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांचा तपासणी अहवाल आल्यानंतर शाळा आणि शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात येईल.
महारुद्र नाळे,
शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, रायगड जिल्हा परिषद