। पनवेल । वार्ताहर ।
होळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपलेला असून, त्यासाठी आतापासूनच होळीच्या विविध रंगांनी पनवेलमधील बाजारपेठ सजली आहे. सध्या रंगपंचमीनिमित्त लहान मुलांसाठी पिचकारी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात लगबग दिसून येत आहे. रंगपंचमीच्या आठवडाभर आधीपासूनच लहान मुले पाण्याच्या पिशव्यांचा मारा करताना दिसत आहेत. तर काही मुले पिचकार्यांतून एकमेकांवर पाणीदेखील उडवत आनंद घेत आहेत.
पनवेल बाजारपेठेत विविध प्रकारचे नैसर्गिक रंग त्याचबरोबर लहानग्यांचे आकर्षण असणार्या विविध प्रकारच्या पिचकार्यांनी बाजारपेठ फुलली आहे. त्यामुळे खरेदीला ग्राहकांची व लहानग्यांची झुंबड उडत आहे. परंतु, यावेळी बाजारात रंगांचे व पिचकार्यांचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत. रंगपंचमीप्रेमींकडून नैसर्गिक रंगांना अधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक सुके रंग 80 ते 100 रुपये, तर ओले रंग 180 रुपयांवर उपलब्ध आहेत. तसेच, बाजारात विविध प्रकारच्या पिचकार्या 190 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध असून, यामध्ये विविध कार्टून पिचकार्यांची क्रेज पाहायला मिळत आहे. यंदा पाठीवर लावणार्या ड्रमच्या पिचकार्या बाजारात भाव खाताना दिसत आहेत.