आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत माघार नाही; आझाद मैदानावर आंदोलनाचा निर्धार
| जालना | प्रतिनिधी |
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवार, दि. 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथील उपोषणाची जागा सोडून मुंबईच्या दिशेने कूच केले. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अंतरवाली सराटी येथून निघताना जरांगे पाटील भावूक झाले. गाडीत बसताच त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले.
यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागणीवरून सरकारसमोर झुकणार नसल्याचे स्पष्ट केले. समाजाच्या लेकरांपेक्षा मला मोठे काय आहे? माझ्या समाजाची लेकरं संकटात आहेत. त्यांच्या कल्याणासाठी मी जातोय. समाजाच्या लेकरांना अर्धवट सोडून मी समाजाला धोका देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
मी माझ्या समाजाला त्रास होऊ देणार नाही. मी लढून मरेन. आरक्षणाची सगळी अंमलबजावणी झाल्याशिवाय आता थांबणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. मुंबईकडे जाताना त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. न्यायदेवतेवर विश्वास ठेवायचा आणि तीच परवानगी समजायची. तुमच्या लेकरांसाठी मी लढेन. तुम्ही माझ्यासोबत राहा. मी जिवंत असो की नसो, समाज मोठा करा. पक्षाला जीव लावू नका, समाजाला जीव लावा, असे जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, मुंबईतील आंदोलनासाठी जरांगे पाटील यांच्या वतीने मुंबई पोलिसांकडे तिसऱ्यांदा अर्ज करण्यात आला आहे. यापूर्वी दोन वेळा आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली होती. नव्या अर्जात 50 जणांना आंदोलनाची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून घालण्यात येणाऱ्या सर्व नियम व अटींचे पालन केले जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. 18 सप्टेंबर रोजी ठरवून दिलेल्या वेळेत आंदोलन करण्यात येईल, असेही अर्जात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने आंदोलनाला परवानगी मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
