आ. गोगावलेंना दीडशे कोटी कशासाठी – आ.जयंत पाटील

| मुंबई | प्रतिनिधी |
विद्यमान महायुती सरकारकडून सत्ताधारी आमदारांवर करण्यात आलेल्या निधी वाटपाच्या खैरातीवरुन आ.जयंत पाटील यांनी जोरदार आक्षेप नोंदविला. आ.भरत गोगावले यांना दीडशे कोटींचा विकास निधी कशासाठी दिला, याचा खुलासा केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली.

विधानपरिषदेत विविध मुद्यावर बोलताना आ.जयंत पाटील यांनी आमदारांवर करण्यात आलेल्या निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित करुन असा बेसुमार निधी कशासाठी दिला गेला, अशी विचारणाही केली.

एवढा मोठा निधी देऊन तो खरोखरच संपणार आहे का? या निधीसाठी खोटी बिले सादर करण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असून, हा एकप्रकारे शासकीय निधीचा दुरुपयोगच आहे,अ शी टीकाही त्यांनी केली. हा जनतेचा पैसा आहे. त्याचा विनियोग योग्य पद्धतीने झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

खोटी बिले सादर करुन या निधीचा दुरुपयोग होणार असेल तर त्याची चौकशी केली जावी. सध्या जिल्हा परिषदेमध्ये अधिकाऱ्यांचेच राज्य आहे. त्यामुळे ते मागणी नसतानाही सुस्थितीमधील वास्तुंबद्दल खोटी अंदाजपत्रके सादर करुन लूटमार करत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

नैना प्रकल्पग्रस्तांचा लाँगमार्च
पनवेल, उरण तालुक्यातील नैना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यासाठी माजी आ.बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नामदेव फडकेंसह अन्य कार्यकर्ते गुरुवारी (दि.27) उरण ते मंत्रालय असा लाँगमार्च काढणार आहेत. सरकारने या लाँगमार्चची दखल घेऊन या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी केली. यापूर्वी सरकारने नैना प्रकल्पाबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

Exit mobile version