किनाऱ्याची धूप, पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन जीवना बंदर या ठिकाणी पूर्वीपासूनच जेट्टी अस्तित्वात होती. परंतु, सदरची जेट्टी ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती अत्यंत खोल समुद्रापर्यंत गेलेली नसल्याने त्या ठिकाणी छोट्या होड्याच लागू शकत होत्या. शासनाने या गोष्टीची दखल घेऊन पर्यटनवाढीच्या दृष्टीने स्पीड बोट किंवा मोठ्या बोटी श्रीवर्धन या ठिकाणी थांबवता याव्या यासाठी जेटीचे नव्याने बांधकाम सुरू केले आहे. अंदाजे 250 कोटी रुपये खर्चून ही जेट्टी विकसित करण्यात येत आहे. या जेट्टीमुळे समुद्रकिनाऱ्याची धूप आणि पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
समुद्रात जेट्टी बांधण्याचे म्हटले की, त्या ठिकाणी भराव हा आलाच. त्यामुळे या जेट्टीच्या बांधकामासाठी लाखो टन मोठ्या दगडाचा वापर करून भराव करण्यात येत आहे. तसेच त्यामध्ये मुरूम व काँक्रिटदेखील ओतण्यात येत आहे. मात्र, जीवनाबंदर जेट्टीसाठी मोठ्या प्रमाणावर भराव झाल्याने समुद्राच्या पाण्यानेदेखील आपले रौद्ररूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व आता ऑक्टोबर महिन्यातदेखील मोठ्या भरतीच्या वेळी श्रीवर्धन येथे बांधण्यात आलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या वरून लाटांचे पाणी उलटून किनारपट्टीच्या भागात येत आहे. भरावामुळे येणाऱ्या लाटांची दिशा बदलली असून, लाटा सरळ येण्याऐवजी तिरक्या दिशेने येत आहेत. परिणामी, संपूर्ण जीवनाबंदर परिसर वाळूने भरून गेला आहे.
त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली जुनी जेट्टीदेखील वाळूने पूर्णपणे भरून गेली आहे. तर खालचा जीवना परिसरातदेखील मोठ्या प्रमाणावर वाळू अडकून राहिल्यामुळे त्या ठिकाणीदेखील अनेक वेळा भरतीच्या वेळीदेखील भूभाग उघडा असल्याचे दिसून येते. तर, श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीवरती फेस्टिवल बीच, शासकीय विश्रामगृहाजवळील बीच व दांडे परिसर या ठिकाणी भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू वाहून ती जीवना परिसरात जमा होत असल्याने या तिन्ही परिसरातील समुद्र खोल होत चालला आहे. धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरून समुद्राकडे उतरण्यासाठी बांधण्यात आलेले रॅम्प व पायऱ्या या पूर्णपणे तुटून गेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर उतरण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे.
पर्यटनावर परिणाम
जीवनाबंदर जेट्टीसाठी अजूनदेखील भराव सुरूच आहे. त्यामुळे अशा प्रकारे भराव सुरू राहिल्यास श्रीवर्धन किनारपट्टीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्याचे गंभीर परिणाम श्रीवर्धनच्या पर्यटन व्यवसायाला भोगावे लागणार, हे निश्चित आहे. यासाठी शासनाने तातडीने श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याची पाहणी करून सध्या असलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची उंची अंदाजे दोन मीटरने वाढविण्याची गरज आहे.
व्यावसायिकांना फटका
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरती भरतीनंतर ओहोटी सुरू झाल्यावरदेखील पाणी पूर्णपणे मागे जात नसल्यामुळे त्या ठिकाणच्या वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी, सेंड बाईक इत्यादी चालविणाऱ्या व्यावसायिकांना नुकसान होत आहे. पर्यायाने पर्यटकांचा ओघ अरावी, कोंडवील बीचकडे वाढलेला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. तरी शासनाने श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याची तातडीने पाहणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





