घरच्या मैदानावर राजस्थानला पाजलं पराभवाचं पाणी
। बंगळुरू। वृत्तसंस्था ।
आरसीबीने अखेरीस यंदाच्या मोसमात घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवला आहे. आरसीबीने अखेरच्या षटकांमध्ये राजस्थान रॉयल्सवर 11 धावांनी शानदार विजय नोंदवला. तर राजस्थान रॉयल्सचा संघ पुन्हा एकदा विजयाच्या उंबरठ्यावर येऊन विजय मिळवण्यात अपयशी ठरला. ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि शुभम दुबे अखेरच्या षटकांमध्ये संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. तर जितेश शर्माची रिव्ह्यूची मागणी टर्निंग पॉईंट ठरली.
जितेशची रिव्ह्यूची मागणी ऐकताच रजत पाटीदार आला आणि त्याने रिव्ह्यूचा इशारा केला. ध्रुव जुरेल 34 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावा करत बाद झाला. यानंतर हेझलवुडने आर्चरला झेलबाद करत 19 व्या षटकात 2 विकेट घेत 1 धाव दिली. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांच्या दमदार अर्धशतकांच्या मदतीने 205 धावा केल्या. यानंतर, यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल यांच्या दमदार खेळींमुळे राजस्थानला विजयाची आशा निर्माण झाली. पण जोश हेझलवूड आणि कृणाल पंड्या यांनी त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीने सामना फिरवला आणि बेंगळुरूला संस्मरणीय विजय मिळवून दिला. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून स्फोटक सुरुवात केली. जयस्वालने वैभव सूर्यवंशीसोबत मिळून फक्त पाचव्या षटकात संघाला 50 धावांचा टप्पा ओलांडून दिला. राजस्थानने पॉवरप्लेमध्येच 72 धावा केल्या होत्या आणि त्याच षटकात जोश हेझलवूडने जैस्वालची विकेट घेत बंगळुरूला मोठा दिलासा दिला. पण नितीश आणि कर्णधार रियान पराग यांनीही आक्रमक फलंदाजी केली आणि 9 व्या षटकापर्यंत संघाला 110 धावांपर्यंत पोहोचवले.
10 व्या षटकात कृणाल पंड्याने रियान परागची विकेट घेतली आणि त्यानंतर फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. कृणालने स्पेलमधील तिसर्या षटकात नितीशलाही बाद केलं. यानंतर, जबाबदारी ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायरवर आली, जे गेल्या 2 सामन्यांमध्ये पराभवाचे खलनायक ठरले होते. त्यानंतर 18 व्या षटकात, जुरेलने भुवनेश्वर कुमारच्या षटकात 22 धावा काढून संघाला सामन्यात कायम ठेवले. पण 19 व्या षटकात पुन्हा सामना फिरला. हेझलवुडने प्रथम जुरेल आणि नंतर जोफ्रा आर्चरला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले आणि फक्त 1 धाव दिली. 20 व्या षटकात आवश्यक असलेल्या 17 धावा राजस्थानच्या आवाक्याबाहेर राहिल्या आणि राजस्थानला 194 धावांवर रोखून संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमावत 205 धावांचा टप्पा ओलांडला. विराट आणि सॉल्टने पॉवरप्लेमध्ये संघाला 50 धावांचा टप्पा गाठून दिला. फिल सॉल्ट 26 धावा करत बाद झाला. विराट कोहलीने 70 धावांची खेळी केली. विराट कोहलीने 43 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 70 धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कलने चांगली फलंदाजी करत 27 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 50 धावा केल्या. यानंतर टीम डेव्हिड 23 धावा तर जितेश शर्माने 20 धावांची खेळी करत संघाला 20 धावांचा टप्पा गाठून दिला. राजस्थानकडून संदीप शर्माने 2 विकेट्स घेतले. तर आर्चर आणि वानिंदू हसरंगाला 1-1 विकेट घेता आली.