सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी

महाविकास आघाडीच्या पाठपुराव्याला यश
उरण नगरपालिका प्रशासनाचा निर्णय

| चिरनेर | प्रतिनिधी |

गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उरण नगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांच्या नोकरीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. कामगार संघटनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, न्यायालयीन लढा आणि महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, वारसा हक्क योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 19 उमेदवारांना सफाई कर्मचारी पदावर नोकरी देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आदेशानंतर नगरपालिका प्रशासनाने 19 वारसांना सेवेत सामावून घेतले. गुरुवारी, दि. 13 रोजी या सर्वांनी सफाई कर्मचारी पदावर अधिकृतपणे रुजू होत सेवेला सुरुवात केली.

सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळावी, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरू होता. राज्यातील सफाई कामगारांच्या वारसांच्या नियुक्तीबाबत न्यायालयीन आदेश झाल्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानेही नगरपालिका प्रशासन संचालनालयाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले होते.

यानंतर म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. महाविकास आघाडीचे नगरसेवक गणेश शिंदे, अतुल ठाकूर, प्रमिला पवार आणि मंगेश कासारे यांनीही सर्वसाधारण सभेत हा प्रश्न उपस्थित करून सफाई कामगारांच्या वारसांच्या बाजूने भूमिका मांडली.

नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनीही वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नगरपालिका प्रशासन संचालनालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबतची अडचण दूर करण्याची मागणी करण्यात आली.

संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यासोबतच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नगरपालिका प्रशासन संचालनालयाने अखेर 19 वारसांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version