पारंपरिक नृत्य, सोंगणे आणि समाजप्रबोधनातून उत्सवाला रंगत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि.26) श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गावागावांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या उत्सवात धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष अनुभवायला मिळाला. पारंपरिक नृत्ये, सोंगणे आणि विविध सादरीकरणांमधून समाजप्रबोधनाचेही कार्य करण्यात आले. या उत्सवाचा आनंद जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे लुटला.
जिल्ह्यातील सुमारे 162 राम मंदिरांमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी विधीवत पूजा करण्यात आली, तर दुपारी जन्मोत्सवाला प्रारंभ झाला. दुपारनंतर गावागावांत भजनांचे कार्यक्रम रंगले आणि संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. लाखो भाविकांनी मंदिरांमध्ये जाऊन श्रीराम व सीतामाईचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अलिबाग तालुक्यातील वावे, रामनाथ तसेच शहरातील ब्राह्मण आळी यांसारख्या ठिकाणी श्रीरामाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. काही ठिकाणी खाद्यपदार्थ, हार-फुले आणि लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानांनीही उत्सवाची शोभा वाढवली. त्यामुळे खरेदीचा उत्साहही मोठ्या प्रमाणात दिसून आला.
सायंकाळी आठनंतर गावांमध्ये मैदानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. विविध सोंगणे काढून लोकांनी उत्सवात रंग भरला. काहींनी वाघ, हत्ती यांची सोंगणे साकारली, तर काहींनी देव-देवतांचे रूप धारण केले. तसेच सावित्रीबाई फुले यांसारख्या सामाजिक व्यक्तिमत्त्वांची सोंगणे साकारून समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. यानंतर मिरवणुकांना सुरुवात झाली. जिल्ह्यातील 129 ठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. याशिवाय 31 हून अधिक ठिकाणी सांस्कृतिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक कलागुणांना व्यासपीठ देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत या उत्सवात अबालवृद्धांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.






