जंक्शन सुधारणा प्रकल्पाला वेग

| पनवेल | प्रतिनिधी |

कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाअंतर्गत मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पनवेल महापालिका आणि सिडको प्राधिकरण यांनी संयुक्त कारवाई करत एमजीएम हॉस्पिटलसमोरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली. मंगळवारी (दि.5) राबविण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईमुळे दीर्घकाळ अडथळा ठरत असलेला रस्ता अखेर मोकळा झाला असून, परिसराने सुटकेचा श्वास घेतला आहे.

एमजीएम हॉस्पिटलसमोरील कॉरिडॉर वाहतुकीसाठी उपलब्ध करून देणे, हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेली पक्की अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या संयुक्त मोहिमेत पनवेल महापालिका, सिडको प्रशासन तसेच पोलीस दलाचे मोठे मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. महापालिका आयुक्त मंगेश चितळे आणि अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या वेळी सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रूपाली माने, अधीक्षक दशरथ भंडारी, उमेश मडवी, सिडकोचे अधिकारी रावसाहेब देवकर तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version