रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!

स्फोटक शोधक आणि स्निफर डॉग म्हणून ‌‘बघिरा’ सज्ज

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी रायगड पोलीस दलात अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून नव्या ‌‘के.9 कमांडो’ची भर पडली आहे. स्फोटक पदार्थ शोधक आणि स्निफर डॉग म्हणून प्रशिक्षित करण्यात येणारा ‌‘बघिरा’ नावाचा श्वान आता रायगड पोलीस दलात दाखल झाला असून, त्यामुळे पोलीस दलाची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.

रायगड पोलीस दलात सध्या दोन हजार 300 हून अधिक मनुष्यबळ कार्यरत असून, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात 28 पोलीस ठाणे, 8 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, सुरक्षा शाखा, सायबर पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, वाचक शाखा आणि जिल्हा विशेष शाखा असे विविध विभाग कार्यरत आहेत.

जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांची उकल, संशयितांचा शोध आणि स्फोटक पदार्थांचा तपास यासाठी श्वान पथकाचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. यासाठी पोलीस मुख्यालयात स्वतंत्र श्वान पथक कार्यरत असून, अनेक महत्त्वाच्या कारवायांमध्ये या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

रायगड पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकात कार्यरत असलेला ‌‘मॅक्स’ नावाचा श्वान नुकताच वयोमानानुसार मृत्यूमुखी पडला होता. त्यानंतर त्याच्या रिक्त जागी मेलिनॉईस जातीचा अत्यंत चपळ, हुशार आणि सतर्क स्वभावाचा लहान श्वान पोलीस दलात दाखल करण्यात आला आहे. या नव्या श्वानाचे नामकरण पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले असून, त्याला ‌‘बघिरा’ असे नाव देण्यात आले आहे.

‌‘बघिरा’ हा स्फोटक पदार्थ शोधक आणि स्निफर डॉग म्हणून कार्यरत राहणार असून, सुरुवातीला त्याला रायगड पोलीस मुख्यालय येथे वयाच्या पाच महिन्यांपर्यंत प्राथमिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर पुढील सात महिन्यांसाठी राज्यातील विशेष प्रशिक्षण केंद्रात त्याला खडतर आणि अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षे ‌‘बघिरा’ रायगड पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथकात कर्तव्य बजावणार आहे. जिल्ह्यातील नागरी सुरक्षेसोबतच सागरी किनारपट्टीची सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक साधने, विशेष पथके आणि प्रशिक्षित श्वान दल उभारण्यावर भर दिला जात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. रायगड पोलीस दलात नव्या ‌‘के.9 कमांडो’च्या आगमनामुळे जिल्ह्याच्या सुरक्षाव्यवस्थेला नवी ताकद मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version