। अलिबाग । प्रतिनिधी ।
कबड्डी हा कोकणातल्या लाल मातीत रंगणारा एक प्रमुख खेळ. कोकणच्या लाल मातीने अनेक धुरंधर कबड्डीपटू कबड्डीविश्वाला दिले आहेत. अनेक जागतिक व राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धांमध्ये कोकणातीलअनेक कबड्डीपटू चमकले आहेत व अनेकांनी देशाचे प्रतिनिधित्व व नेतृत्वही केले आहे. असाच एक धुरंधर कबड्डीपटू स्व. सिकंदर केळकर याचे निधन झाले. अल्पवयातच निधन झाल्याने संपूर्ण जबाबदारी पत्नी श्वेता केळकर यांच्यावर आली. पतीच्या जाण्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आणि संपूर्ण कुटूंब आर्थिक संकटात सापडले. रायगड जिल्ह्याचे विशेषतः बांधणचे नाव उंचावणार्या सिकंदर केळकरच्या कुटूंबियांना, त्यांच्या चिमुकल्या लेकरांना गरज आहे, आपल्या मदतीची.
स्व. सिकंदर यांनी अनेक कबड्डी सामन्यांची रंगत वाढवली. राज्यस्तरीय तसेच गावोगावी होणार्या अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. सिकंदर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबियांवर ओढवलेल्या संकटात सहकार्य करण्याच्या उद्देशाने स्व. सिकंदर केळकर मित्र मंडळाच्यावतीने बुधवारी (दि.25) भव्य व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सायंकाळी 4 वाजता सुरु होणार आहे.
स्व. सिकंदर केळकर यांच्या परिवाराला अर्थ सहाय्य करण्याच्या मानवतेच्या भावनेतून कृषीवलने एक हात मदतीचा पुढे केला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जमा होणारा निधी स्व.सिकंदर केळकर यांच्या कुटूंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे. आर्थिक मदतीसाठी 9220000133 या क्रमांकवर गुगल पे करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.