। मुंबई । प्रतिनिधी ।
विक्रोळी पूर्व येथील साई मंदिरा शेजारील मैदानात कबड्डीचा थरार रंगणार आहे. यंग स्टार विरुद्ध शूर जवान या पुरुषातील, तर सत्यम विरुद्ध एम. आय. इ. एस. या महिलातील सामन्याला दि. 01 एप्रिलपासून टागोर नगर मित्र मंडळाच्या पुरुष व महिला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. हे सामने सायं. 6 ते 10 या वेळेत खेळविण्यात येथील. या स्पर्धेत 19 पुरुष, तर 09 महिला संघानी सहभाग घेतला आहे. तसेच या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचाला रोख एक हजार रुपये व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तर स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघाला रोख पंधरा हजार रुपये व चषक, तर उपविजेत्या संघाला रोख दहा हजार रुपये व चषक प्रदान करण्यात येईल.
तसेच, स्पर्धेतील महिला संघाला रोख आठ हजार रुपये व चषक, तर उपविजेत्या संघाला रोख पाच हजार रुपये व चषक प्रदान करण्यात येईल. स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूला प्रत्येकी रोख एक हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर प्रतिदिनीचा मानकरी ठरणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूस प्रत्येकी रोख पाचशे रुपये प्रदान करण्यात येतील. तसेच, स्पर्धेतील पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या प्रत्येक पुरुष व महिला संघाला देखील चषक प्रदान करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू गिरीश पवार यांनी एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमांना दिली.
विक्रोळीत रंगणार कबड्डीचा थरार
