काकस्पर्श! रोह्यात घडतेय नवलाईची गोष्ट

। रोहा । प्रतिनिधी ।
कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यांनतर काकस्पर्श ही सर्वात महत्वाची बाब मानली जाते. आजवर आपण सर्वांनीच कावळा पिंडाच्या नैवेद्याला ग्रहण करत असल्याचे ऐकले व पहिले आहे. परंतु संपूर्ण १३ दिवस मृत व्यक्तीच्या फोटोसमोर घरात ठेवले जाणारे जेवणाचे ताट मात्र कावळा स्वतः घरात येऊन खात असल्याचे बहुधा पहिल्यांदाच घडले आहे.


रोहा तालुक्यातील शेकाप नेते नंदकुमार म्हात्रे यांच्या मातोश्रीचे ६ जून रोजी निधन झाले. त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यापासून एक कावळा दररोज सकाळ, दुपार व संध्याकाळी घरात येऊन म्हात्रे यांच्या मातोश्रींच्या फोटो समोर ठेवलेले अन्न ग्रहण करत असल्याने सर्वत्र नवल व्यक्त केले जात आहे.


हिंदू धर्मात अंत्यसंस्कारात कावळ्याला विशेष महत्व आहे. काकस्पर्श न झाल्यास नातेवाईकांना अनेक काळ तिष्ठत बसावे लागते. मृत माणसाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू अशा आणाभाका घेतल्या जातात. त्यानंतर काही वेळाने काकस्पर्श होतो. अन्यथा दर्भाचा कावळा करून पिंडाला शिवला जातो. कावळा हा पक्षी घरात येऊन मृत व्यक्तीच्या फोटो समोरील अन्न ग्रहण करणे तसे दुर्मिळच. असे असताना घरात येऊन कावळा म्हात्रेंच्या दिवंगत मातोश्रींच्या समोरील अन्न दिवसातून तीन वेळा येऊन खात असल्याने नवल व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version