कळंब-करचुंडे वाड्यांना रस्त्याची प्रतीक्षा

मंजूर सडक योजनेचे कामाला मुहूर्त केव्हा? नागरिकांमध्ये नाराजी

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील कळंब व करचुंडे येथील आदिवासी वाड्यांमध्ये नागरिकांना जाणे-येण्यासाठी अद्याप रस्ता उपलब्ध नाही. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या वाड्यांमध्ये रस्त्याची सुविधा नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

नागरिकांनी प्रयत्न करून रस्ता ज्यांच्या जमिनीतून जाणार आहे त्यांची संमती घेतली असूनही काम सुरू झालेले नाही. प्रधानमंत्री सडक योजनेतून मंजूर झालेला रस्ता अद्याप प्रत्यक्षात सुरू झालेला नाही. संबंधित शेतकऱ्यांकडून कोणतीही तक्रार नसतानाही रस्ता सुरू होण्यात विलंब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मंजुरी मिळून एक वर्ष उलटले असून, पावसाळा तोंडावर आल्यामुळे आदिवासी वाड्यातील लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

या वाड्यांतील नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शाळेत जाणाऱ्या मुलांना रोजच्या प्रवासात अडथळे येतात. रुग्णालयात जाणाऱ्या आजारी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळणे कठीण होते. शेतीमाल बाजारात नेणाऱ्या शेतकऱ्यांना वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक बिकट होते. चिखल, पाण्याचे लोट आणि वाहतुकीची साधने नसल्याने नागरिकांना गावाबाहेर जाणे कठीण होते. स्थानिक नागरिकांनी शासनाने मंजूर केलेल्या रस्त्याचे काम त्वरित सुरू व्हावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा या आदिवासी वाड्यांतील नागरिकांना आपला आवाज पोहोचवण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्ता हा केवळ सुविधा नसून, त्यांच्या जीवनाचा आधार आहे.

Exit mobile version