चाऱ्याच्या अभावामुळे गुरांची फरपट; जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
जून महिन्याचा मध्य उलटला तरी अद्याप पाऊस अजून दाखल झालेला नाही. त्यामुळे उन्हाचा तडाखा सर्वत्रच अधिकच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चाऱ्याचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे हि मोकाट गुरे पालीतील डम्पिंग ग्राऊंड व उकिरड्यावर जाऊन मिळेल ते अन्न खात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय स्वच्छतेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
पालीतील डम्पिंग ग्राऊंडवर तसेच जुने पोलीस स्थानक, मधली आळी, बल्लाळेश्वर मंदिर व बल्लाळेश्वर नगर या ठिकाणी असलेल्या उकिरड्यावर सकाळपासूनच मुकाट गुरांची गर्दी असते. येथे टाकलेला कचरा ही गुरे अस्ताव्यस्त करतात, त्यामुळे येथे घाण व दुर्गंधी पसरते. त्यामुळे येथील नागरिकांसह गुरांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. येथील डम्पिंग ग्राउंड व उकिरड्यावरील कचऱ्यात धातू तसेच इंजेक्शनच्या सुयांसारख्या अनुकुचिदार घटक असतात. ते पोटात गेल्यामुळे जनावरांच्या जठराला व अन्ननलिकेला इजा पोहचते. तसेच, बऱ्याचवेळा या ठिकाणी टाकुन दिलेले अन्न पदार्थ पिशव्यांमध्ये असते. त्यातील बरेचसे अन्न सडलेले असते आणि ते त्या प्लास्टिकला चिकटतात. त्यामुळे त्या अन्नासोबत गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लास्टिकदेखील जाते. प्लास्टिकसह सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते, तसेच अन्नाच्या शोधात सतत चालल्याने त्यांची ऊर्जा देखील कमी होऊन अशक्तपणा येतो. तसेच, सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते आणि त्यांचा मृत्यू देखील होतो. काही वेळेस अशा मेलेल्या गुरांची हाडे इतर गुरे आणि प्राणी चघळतात व पर्यायाने त्यांचादेखील मृत्यू होतो. हे दुष्टचक्र सुरूच राहते.
प्लास्टिक गुरांना धोकादायक
शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये. त्यांना पेंढा किंवा सुके गवत खाऊ घालावे. कचऱ्यात किंवा उकिरड्यावर टाकलेले अन्न पदार्थ खाऊन गुरांची पचनक्रिया बिघडते. मानवी खाद्य हे जनावरांसाठी नाही. वारंवार प्लास्टिक पोटात गेल्याने ते पोटात साठून गुरांचा मृत्यू देखील होऊ शकतो. शहरी तसेच ग्रामीण भागात निसर्गपूरक जिवन अंगिकारणे गरजेचे आहे.
उष्म्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी किंवा गुरेपालक यांनी आपली गुरे चरण्यासाठी मोकाट सोडू नयेत. मोकाट सोडलेल्या गुरांचे अपघात होऊन त्यांचा मृत्यू होतो, तसेच जखमी देखील होतात. शासनाने मोकाट गुरांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. किंवा पशुपालकांना यासाठी अनुदान दिले पाहिजे.
– केतन म्हसके, उपाध्यक्ष,
शिवऋण प्रतिष्ठान व गोरक्षक







