। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नव्याने अस्तिवात आलेल्या जामरुंग ग्रुपग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय पिंपरकर यांच्या संकल्पनेतुन सरपंच चषक 2022 या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत कामतपाडा गाव क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले.
जामरुंग ग्रामपंचायतमधील बाळ गोपाळ क्रिकेट संघाने सरपंच चषक 2022 चे आयोजन केले होते. पिंपरकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा ग्रामपंचायत मधील गावांचे क्रिकेट संघ यांच्यात रंगली. अनिल पिंपरकर आणि पवन मेदगे तसेच बाळ गोपाळ क्रिकेट संघाने पुढाकार घेऊन रंगलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कामतपाडा गाव क्रिकेट संघाने पेठ गाव क्रिकेट संघावर विजय मिळविला. तर जामरुंग गावाच्या संघाला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
दुर्गम गावांनी बनलेल्या जामरुंग ग्रुपग्राम पंचायतमधील खेळाडूंना क्रिकेट या खेळात चालना मिळावी यासाठी प्रोत्साहन म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. सहभागी सर्व आठ संघांकडून कोणत्याही स्वरूपात प्रवेश फी आकारली नव्हती. स्पर्धेत मालिकावीर पुरस्काराचा मानकरी अभिषेक सावंत ठरला तर उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून रोशन सावंत तर उत्कृष्ठ फलंदाज अरविंद बांगर यास सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना रोख रक्कम तसेच सरपंच चषक 2022 देण्यात आला.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापती नारायण डामसे यांच्या हस्ते झाले तर पारितोषिक वितरण सरपंच दत्तात्रय पिंपरकर यांचे हस्ते झाले.त्यावेळी उपसरपंच शिवाजी बिबवे, ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत, सुनिता मेदगे, वेदिका सावंत, रोहिणी घुडे, अश्विनी पिंपरकर, रेखा शेंडे, फसाबाई ठोंबरे, छगन गावंडा, ज्योत्स्ना मेदगे तसेच डुक्करपाडा तसेच स्थानिक सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
जामरुंग सरपंच चषकात कामतपाडा संघ विजयी
