। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठे सेक्टर 8 येथील पाण्याच्या टाकीसमोर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डा खोदून ठेवला आहे. या खड्ड्याच्या आजूबाजूच्या रस्त्यावरसुद्धा मोठ मोठे खड्डे पडले असून, रस्त्यावर पूर्ण चिखल झालेला आहे. पोलीस ठाणे ते ऐश्वर्या हॉटेल या मुख्य रहदारीचा रस्ता असून, खड्डे अणि चिखलामुळे अनेक दुचाकीस्वरांचा घसरून अपघात झाला आहे.
अनेक नागरिक या रस्त्याने ये-जा करत असतात; परंतु रस्त्यावरील खोदकाम आणि चिखलामुळे नागरिकांना चालणेसुद्धा मुश्किल झाले आहे. ज्येष्ठ नागरिक अणि महिलांची या रस्त्यावरुन चिखलातून चालताना अक्षरश: तारांबळ उडत आहे. याबाबत अनेक नागरिकांनी कामोठे कॉलोनी फोरम महिला अध्यक्षा जयश्री झा यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. महापालिकेला रस्त्यावर पडलेले खड्डे दिसत नाहीत का? केवळ मलमत्ता करवसुलीसाठी नागरिकांच्या मागे लागण्याचे एकमेव काम पालिकेला आहे का? पालिकेचा निष्काळजीपणा भविष्यात काही मोठा अपघात झाल्यास कोण जबाबदार राहील? पालिकेच्या वतीने सदर समस्येची तात्काळ दखल घेत जर पालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न केल्यास कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.