-अतुल गुळवणी
रायगडच्या राजकीय क्षेत्रात शिवतीर्थ या वास्तुला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.जिल्ह्याच्या विकासाचे आणि राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या या वास्तुला आता घरघर लागली आहे. कोणत्याही क्षणी या वास्तुवर हातोडा पडून ती भव्यदिव्य वास्तु इतिहासजमा होईल.पण, याच वास्तूत आतापर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या, अनेकांचा राजकीय उदयही याच वास्तूत झाला आणि अनेकांचा अस्तही याच इमारतीत झालेला पहायला मिळाला.
रायगड जिल्ह्याचे राजकारण नेहमीच जिल्हा परिषदेच्या भोवती फिरत राहिलेले आहे.ज्या राजकीय पक्षाकडे जिल्हा परिषदेची सत्ता, त्याच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व राहिलेले आहे.त्यामुळे शिवतीर्थावर आपल्या पक्षाचा ध्वज फडकविण्यासाठी नेहमीच जिल्ह्यातील शेकाप, काँग्रेस यांच्यात चुरस दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर काँग्रेस सत्तेतून बाहेरच पडली आणि जिल्ह्याचे राजकारण शेकाप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांबरोबर फिरत राहिले. जिल्हा परिषदेचा आतापर्यंतच राजकीय प्रवास पाहिला तर काँग्रेस, शेकाप अशी आलटून-पालटून सत्ता मिळत गेली. अपवाद फक्त शेकापच्या प्रभाकर पाटील यांच्या कार्यकालाचा. त्यांच्या कार्यकालात सलग 12 वर्षे जिल्हा परिषदेवर शेकापचीच सत्ता राहिली. याच काळात प्रभाकर पाटील यांनी मोठ्या हिकमतीने जिल्हा परिषदेची विखुरलेली सर्व कार्यालये अलिबाग येथे आणून समुद्राला साक्षी ठेवत भव्यदिव्य अशा शिवतीर्थाची निर्मिती केली. ही इमारत बांधताना जिल्ह्यात विकासाची गंगा वाहिली पाहिजे या उदात्त हेतूने या वास्तुला शिवतीर्थ हे नाव दिले. शिव म्हणजे कल्याण आणि तीर्थ म्हणजे पवित्र पाणी. या वास्तूमधून सागराप्रमाणे विकासाच्या आणि जनकल्याणाच्या योजना बाहेर पडाव्यात, अशी शिवतीर्थामागची संकल्पना त्यांनी मनी बाळगली होती आणि शिवतीर्थावर आतापर्यंत ज्या ज्या राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली, त्यांनी आपापल्या परीने जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली, हे कुणीही नाकारु शकत नाही.

राजकीय उदय झालेले नेते
या वास्तुतून अनेक नेते उदयास आले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने राज्याच्या राजकारणात चांगला ठसा उमटविला. जिल्हा परिषदेमधून राजकीय कारकीर्द सुरु करुन थेट राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविले, त्यामध्ये श्रीवर्धनचे रवींद्र राऊत, मोहन पाटील, मीनाक्षी पाटील, सुनील तटकरे, अदिती तटकरे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. याशिवाय जयंत पाटील, पंडित पाटील, सुरेश लाड, विवेक पाटील, मधुकर ठाकूर, तुकाराम सुर्वे, अनिल तटकरे, बाळाराम पाटील, माणिकराव जगताप, महेंद्र दळवी यांनी जिल्हा परिषदेपासून राजकीय कारकिर्द सुरु करीत आमदारकीपर्यंत मजल मारली. शेकापचे जयंत पाटील यांनी काहीकाळ विधानपरिषदेचे प्रभारी सभापतीपदही भूषविले होते. आता यामधील रवींद्र राऊत, मोहन पाटील आणि माणिकराव जगताप हे हयात नाहीत.
राजसत्तेलाही हादरा
शिवतीर्थ हे नेहमीच रायगडच्या राजकारणाचे सत्ताकेंद्र राहिलेले आहे. त्याचे पडसाद अनेकदा राज्याच्या राजकारणातही उमटले आहेत. अगदी सुप्रिया पाटील या अध्यक्ष असताना तत्कालीन विलासराव देशमुख सरकारला अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले होते. त्या राजकीय भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू शिवतीर्थच होते.
सत्तेसाठी अनेक आघाड्या
शिवतीर्थावर सत्ता मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांना प्रसंगानुरुप राजकीय आघाड्या करुन अस्तित्व टिकवावे लागले. यामध्ये कधी शेकाप-काँग्रेस, शेकाप-राष्ट्रवादी, काँग्रेस-शिवसेना तर कधी शिवसेना-राष्ट्रवादी, शिवसेना-शेकाप असे परस्परविरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र आले होते. विशेष म्हणजे, गेल्या पंचवीस वर्षात एकाही पक्षाला निर्विवादपणे सत्ता मिळालेली नाही. तडजोडीचे राजकारण करीतच प्रस्थापित पक्षांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात धन्यता मानली.
घराण्यांचे वर्चस्व
रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात प्रभाकर पाटील आणि सुनील तटकरे परिवाराचे कायम वर्चस्व राहिलेले आहे.प्रभाकर पाटील यांच्यासह सुप्रिया पाटील, पंडित पाटील, आस्वाद पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. याशिवाय मीनाक्षी पाटील, जयंत पाटील, भावना पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम पाहिले. याचबरोबरच सुनील तटकरे यांच्यासह कन्या अदिती तटकरे, बंधू अनिल तटकरे, शुभदा तटकरे यांनीही जिल्हा परिषदेचे सदस्या म्हणून काही काळ काम पाहिले होते. भरत गोगावले, सुषमा गोगावले, मोहन पाटील, त्यांच्या स्नुषा निलिमा पाटील यांनीही जिल्हा परिषदेपासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.
वादविवादाचे प्रसंग
जिल्हा परिषद राजकारणाच्या निमित्ताने अनेकदा वादविवादाचे प्रसंगही या शिवतीर्थाने अनुभवले. जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड असो वा सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम.प्रत्येक निवडीच्यावेळी अलिबागला शिवतीर्थाभोवती पोलिसांचा गराडा पडलेला असायचा.अरे फडकला रे फडकला लालबावटा फडकला, शेकाप जिंदाबाद, आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणांची सवयही याच वास्तुला सातत्याने झालेली होती. अविश्वास ठरावाच्यावेळीही वातावरण इतके तंग असायचे की जणू राजकीय रणभूमीच येथे निर्माण झालेली असायची.हे सारे या शिवतीर्थाने अनुभवले.
कर्तबगार अधिकारी
अनेक कर्तबगार अधिकारीही याच वास्तुत कार्यरत राहिले होते. अनेकाचे विवाहही याच वास्तूत सरकारी सेवा बजावताना पार पडले होते. त्यामुळे अनेकदा अधिकारी, कर्मचारी वर्गातही शिवतीर्थावर या, लग्नगाठ बांधून जा, अशी विनोदाने शेरेबाजी चालायची. याच अधिकार्यांपैकी कित्येकांना लाच घेतानाही पकडण्यात आले. हा काळा डागही याच शिवतीर्थाला लागलाय.
मोर्चेच मोर्चे
जिल्हा परिषद हे जिल्ह्याचे सत्ताकेंद्र असल्याने जिल्ह्यातील सर्वसामान्यांची नाळ या वास्तुशी जोडली गेली आहे. अनेकदा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी समाजातील विविध घटकांनी याच चलो शिवतीर्थ असा नारा देत आतापर्यंत हजारो उपोषणे केली, शेकड्यांनी मोठाले मोर्चेही निघाले. अनेकांना न्याय मिळाला तर अजूनही शेकडोजण न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. हे सारे याच वास्तुने अनुभवले.
आज या सार्या कटू, गोड आठवणी आपल्या हृदयात साठवून ठेवून शिवतीर्थ इतिहासाच्या साक्षीदाराप्रमाणे दीपस्तंभासारखा उभा आहे. या वास्तुचे आयुष्य संपल्याचे कारण देत प्रशासनाने नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रक्रियाही सुरु झालेली आहे. मात्र, अद्याप या वास्तुवर हातोडा पडलेला नाही. आज ना उद्या त्यावर तो पडेल. हे कुणीही नाकारु शकत नाही. गेली चार दशके अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या या वास्तुच्या ठिकाणी भविष्यात नवी वास्तू उभारली जाईल. ती वास्तूही अशीच शिवतीर्थासारखी लोकाभिमुख व्हावी, एवढीच सदिच्छा.