कर्जत शहराचा पाणीप्रश्‍न पेटला

कोतवालनगरमधील नागरिक पालिकेवर धडकले

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरातील कोतवाल नगर भागात गेली दोन महिने अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे संतापलेल्या कोतवाल नगर भागातील नागरिकांनी कर्जत नगरपरिषद कार्यालयात धडक दिली. प्रतिष्ठित नागरिक विजय बेडेकर यांनी पुढाकार घेऊन या नगरातील सर्व नागरिकांना पाण्याच्या प्रश्‍नांवर एकत्र केले. पाणी मिळत नसल्याने कोतवालनगर भागातील महिलांचां या धडक मोर्चात पालिका अधिकार्‍यांना धारेवर धरले.

कर्जत शहरातील महत्वाचा भाग म्हणून हुतात्मा भाई कोतवाल नगर ओळखला जातो.शहरातील अन्य सर्व भागापेक्षा कोतवाल नगर हा परिसर खोलगट भागातील परिसर ओळखला जातो.कर्जत प्रादेशिक नळपाणी योजना झाल्यापासून कोतवाल नगर येथे पाणी कमी दाबाने येत आहे.कर्जतमध्ये सर्व ठिकाणी पाणी सोडून शेवटी आमच्या येथे सोडत आले आहेत. तरीदेखील या भागातील नागरिक हे अपुर्‍या पाणी पुरवठा असून देखील त्या अपुर्‍या पाण्यावर घरातील सर्व कामे पूर्ण करीत होते.त्यात मागील दोन महिने नळाला पाणी येत नव्हते.त्यामुळे स्थानिक नागरिक हे दररोज पाण्याचे टँकर मागवून पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न निकाली काढावा लागतो.हुतात्मा भाई कोतवाल नगरमध्ये अपुर्‍या पाण्याबरोबर नगरातील साफसफाई देखील वेळेवर होत नसल्याने या भागातील नागरिक संतप्त आहेत.त्यामुळे या भागातील प्रतिष्ठित नागरिक विजय बेडेकर यांनी कोतवाल नगर भागातील सर्व रहिवाशी यांना एकत्र केले. त्यानंतर आज कोतवाल नगरातील सर्व नागरिक हे कर्जत नगरपरिषदमध्ये पोहोचले.

कोतवाल नगर भागातील नागरिकांनी पालिका पाणी पुरवठा अधिकारी यांना घेराव घातला.त्यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्गाची संख्या मोठी होती.विजय बेडेकर, सुनील हरपूडे, हेमंत ठाणगे,शेखर सावंत, भाई लाड,दिनेश सोलंकी, पंढरीनाथ बडेकर,संतोष भासे, भालचंद्र जोशी,तुषार दिवेकर, सुरज तांडेल,नितीन तांबडे,नाथा राणे,मीना प्रभावळकर,संगीता गोडबोले,संध्या बेडेकर,शर्वरी फडके,कांता सांगळे,छाया गांगल आदी उपस्थित होते. यावेळी पालिका अधिकार्‍यांनी उद्या सकाळी पाण्याची जलवाहिनी पाहण्यासाठी कोतवाल नगर भागात पोहोचत आहोत. त्यादिवशी कोणत्याही अडचणी दूर झाल्या नाहीत, तर पुन्हा कोतवाल नगर भागात येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली काढतील असे आश्‍वासन पाणी पुरवठा अभियंता स्वागत विरंबोळे यांनी नागरिकांना दिले आहे. तर या भागातील खासगी आणि व्यावसायिक जलवाहिन्या वेगळ्या करण्यात याव्यात, अशी सूचना नागरिकांनी केली आहे.

Exit mobile version