| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुका अष्टविनायक बांधकाम मटेरियल सप्लायर्स वेल्फेअर असोसिएशन ही नोंदणीकृत असलेली संघटना विविध मागण्यांसाठी क्रशर स्टोन असोसिएशन संघटनेविरोधात रस्त्यावर उतरली आहे. संघटनेतील शेकडोने पदाधिकारी आपली वाहने रस्त्याच्या कडेला बंद करून बेमुदत पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने तालुक्यातील बांधकाम व्यवसायधारक अडचणीत सापडले आहेत. क्रशर स्टोन मालक संघटना सप्लार्यसला वेगळा दर देत असून परस्पर कमी दरामध्ये माल बांधकामधारकला जागेवर पोहच करीत असल्याने उपसमारीची वेळ आलेल्या या सप्लार्यस संघटनेने अखेर शांततेत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील तीव्र आंदोलन हे तहसील कार्यलयाबाहेर करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून दुसरीकडे इमारतीचे बांधकामे देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत, परंतु ज्या बांधकामाला महत्वाची लागणारी खडी क्रशर स्टोन मालकाकडून सप्लायर्स हे विकत घेत असतात. त्याच सप्लार्यसला स्टोन मालक वेगळ्या दराने जागेवर खडी देतो तर दुसरीकडे स्टोन मालक खरेदीदाराला स्वतः वाहनाने घरपोच कमी दरामध्ये जागेवर देत असल्याने यांचा परिणाम खडी सप्लायर्स करणाऱ्यां व्यवसाय धारकांच्या व्यवसायावर झाला. त्यामुळे कर्जत तालुका अष्टविनायक बांधकाम मटेरियल सप्लायर्स वेल्फेअर असोसिएशन ह्या नोंदणीकृत असलेली ही संघटना ह्याच मुद्द्यावर आक्रमक झाली असून त्यांनी आज कर्जत चार फाटा येथे आवाज उठवत शांततेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
असोसिएशनचे अध्यक्ष सुनील घोडविंदे, उपाध्यक्ष प्रदीप ठाकरे, कार्याध्यक्ष राजेश लाड, सचिव दिलीप घरत, अतुल कडू, सचिन झोरे, अजिंक्य मनवे, चेतन पवाळी या पदाधिकांऱ्यासह रॅम राणे, सुभाष मिसाळ, प्रवीण बैलमारे आदी शेकडो सदस्य रस्त्यावर उतरले व घोषणा दिल्या. हे आंदोलन बेमुदत असून आता पर्यंत शासन स्थरावर तर क्रशर स्टोन धारक यांच्यात बैठकीत काही तोडगा निघत नसल्याने नाईलाजास्तव तीव्र आंदोलन छेडले जाईल असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष ॲॅड. रंजना धुळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आंदोलनाला पाठिंबा दिला.