आडीवली, मोहीली गावात पाणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीला रात्रीपासून पूर आला आहे. त्या पुरामुळे तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, शासनाने परवानग्या दिल्याने उल्हास नदी पात्रात दगडी भिंत बांधण्यात आली आणि त्यामुळे कर्जत-कोंडीवडे रस्ता वाहतुकीस 24 तास बंद होता. तर त्या भागात घालण्यात आलेल्या भिंतीमुळे उल्हास नदीच्या परिसरात असलेल्या आडीवली आणि मोहिली गावातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
खंडाळा घाटात उगम पावणार्या उल्हास नदीमध्ये आडीवली परिसरात खासगी बोट कंपनीने जमीन विकत घेतली आहे. मात्र, आपली काही जमीन सध्याच्या नदी पात्रात आहे आणि त्यामुळे त्या खासगी जमीन मालकाने शासनाच्या परवानग्या घेऊन नदी पात्रात 200 मीटर लांबीची भिंत घातली. स्थानिक प्रशासनाने त्या ठिकाणी भिंत बांधण्यासाठी परवानगी दिली नव्हती आणि तरीदेखील वरिष्ठ कार्यालयांनी कोणत्या आधारे परवानगी दिली. उल्हास नदीचे पूर रेषा यांचा विचार न करता बांधकाम सुरू केले. नदी पात्रात बांधकाम सुरू झाल्यापासून स्थानिक ग्रामस्थांनी तहसीलदार आणि पाटबंधारे यांच्याकडे तक्रारी करून आक्षेप घेतला होता. मात्र त्या भिंतीमुळे मागील 15 दिवसात दोनदा आडीवली येथे कर्जत कोंदिवडे रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. रात्रीपासून रस्त्यावर पाणी साचले होते आणि मोहीलि पुलावरून पाणी वाहून जात असल्याने ते पाणी आजूबाजूच्या गावातील घरांमध्ये देखील पोहोचले. दुसरीकडे या पाण्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.तर ती भिंत गावात पाणी शिरण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने प्रशासनाने ती भिंत काढून टाकावी अशी मागणी आडीवली आणि मोहिलि ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.






