।नेरळ । वार्ताहर ।
कर्जत नगरपालिका यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कचरा मुक्त शहर बरोबर हागणदारी मुक्त शहराच्या नामांकनमध्ये तिसरे मानांकन मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी शहरातील पब्लिक टॉयलेट आणि कम्युनिटी टॉयलेट वर सर्व लक्ष केंद्रित केले आहे. तर पब्लिक टॉयलेटमध्ये महिला वर्गासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार असून त्यात सॅनिटरी पॅडसाठी व्हेंडिंग मशीन आणि प्रक्रिया करणारी मशीन बसविण्याचे काम प्रगतीत आहे.
क वर्ग नगरपालिका असलेल्या कर्जत शहराची वाढ झपाट्याने होत आहे. मात्र तरीदेखील नगरपालिका हद्दीत यापूर्वीच हागणदारी मुक्त अभियान यशस्वी झाले आहे. शहरात एकूण 6820 कुटुंब असून त्यातील केवळ पाच टक्के लोकांकडे वैयक्तिक शौचालय नाही. त्या कुटुंबाकडे राहण्यासाठी असलेली जागा अपुरी असल्याने वैयक्तिक शौचालय अशी कुटुंब उभारू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन पालिकेने शहरातील विविध भागात नऊ ठिकाणी कम्युनिटी टॉयलेट उभारले आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हे सर्व कम्युनिटी टॉयलेट उभारले गेले असून शहरातील कोणताही व्यक्ती उघड्यावर शौचास जात नाही. त्यात वैयक्तिक शौचालय बांधू न शकणार्या नागरिकांसाठी स्वच्छ भारत मिशन मधून प्रोत्साहन निधी देण्याची योजना आहे, त्या योजनेतून पालिका वैयक्तिक कुटुंबांनी आपल्या घराच्या आजूबाजूला वैयक्तिक शौचालय बांधावे यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. आतापर्यंत पालिकेने 665 कुटुंबांना 12 हजाराची प्रत्येकी मदत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी केली असून मागणीनुसार त्या सर्व नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत मिशन मधून अर्थ सहाय देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नगरपरिषदला आतापर्यंत हागणदारी मुक्त अभियान मध्ये दोन स्टार मिळाले आहेत.त्यामुळे कर्जत नगरपालिका प्रशासनाने आता राज्यातील हागणदारी मुक्त शहराच्या यादीत तिसरे मानांकन मिळविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.त्यासाठी प्रामुख्याने पब्लिक टॉयलेट ऐवजी नागरिकांनी वैयक्तिक शौचालय साठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालिकेचे वतीने मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील हे केले आहे.