शेतकर्यांसाठी बसूनच तर राजकीय नेत्यांसाठी उभे राहून स्वीकारतात निवेदने
। नेरळ । प्रतिनिधी ।
ब्रिटिश काळापासून तालुक्याचे राजे म्हणून तहसीलदार या पदाला महत्व आहे. मात्र, तेच तहसीलदार आता महाराष्ट्र राज्य पुरोगामी म्हणून ओळखले जात असताना तालुक्यातील शेतकर्यांना दुजाभाव देत असल्याचे दिसून येत आहेत. कर्जत तालुक्याचे राजे असलेले तहसीलदार हे शेतकरी, सर्वसामान्य लोकांची निवेदन खुर्चीवर बसूनच स्वीकारतात, मात्र नेते मंडळींची निवेदने त्या नेत्यांना डायसवर बोलावून खुर्चीतून उभे राहून स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तहसीलदारांच्या अशा भूमिकेबद्दल शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कर्जत तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार डॉ.धनंजय जाधव तालुक्याचे प्रमुख म्हणून बसत असतात. तालुक्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातून सर्वसामान्य लोक आपल्या समस्यांची वेगवेगळी निवेदने घेऊन त्यांच्या भेटीसाठी जात असतात. त्यांचे कार्यालय ज्या प्रशासकीय भवनमध्ये आहे तेथे तहसीलदार हे आपल्या दालनात वातानुकूलीत हवेत बसलेले असतात. मात्र, त्यांना भेटण्यास येणार्या सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर एकही पंखा नाही. त्यामुळे घामाच्या धारांसह सर्वसामान्य लोक तहसीलदारांच्या भेटीच्या प्रतीक्षेत असतात. तहसीलदार निवेदने देण्यासाठी आलेल्या लोकांना आपल्या दालनात बोलावतात आणि निवेदने स्वीकारतात. मात्र, तहसीलदार हे त्यावेळी आपल्या खुर्चीवर बसलेले असतात आणि शेतकरी त्यांच्यापासून किमान पाच फूट लांब उभी असते. त्यामुळे निवेदन देण्यासाठीदेखील निवेदनकर्त्यांना कसरत करावी लागते.
सर्वसामान्य लोक आपले प्रश्न सुटतील म्हणून तहसीलदार यांना निवेदने देण्यासाठी जात असतात. त्यावेळी तहसीलदार हे त्या शेतकरी, सर्वसामान्य लोकांच्या संबंधित प्रश्नांचे अधिकार्यांना बोलावून प्रश्न सोडविण्यासाठी काहीतरी कार्यवाही करतील अशी अपेक्षा असते. मात्र, तसे कधी होताना दिसत नाही आणि त्यामुळे तहसीलदारांकडून निवेदने स्वीकारण्याचा केवळ सोपस्कार केला जात आहे काय? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. त्याहून वेगळी परिस्थिती कर्जत तहसीलदार यांच्या कार्यालयात दिसून आली ती म्हणजे तहसीलदार हे राजकीय पक्षांचे नेते निवेदने द्यायला आले कि त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपल्या डायसवर बोलावतात. तहसीलदार पदाच्या खुर्चीवरून उभे राहतात आणि निवेदने स्वीकारतात. त्याच कार्यालयात कोणताही राजकीय वरदहस्त नसलेले शेतकरी ज्यावेळी निवेदने घेण्यासाठी जातात त्यावेळेस मात्र, वेगळी वागणूक दिली जाते.
छोट्यांसाठी वेगळे आणि मोठ्यांसाठी वेगळे नियम. पक्षाचे नेते आले की त्यांना शिपायांमार्फत रॉयल एन्ट्री मात्र गरिबांना बाहेर थांबा येथे उभे राहू नका तिथे थांबू नका अशी हाडतुड वागणूक मिळत असते. सामान्य जनता ही आपल्या कार्यालयामध्ये न्यायाच्या अपेक्षित येत असते नाही की अपमान करून घेण्यासाठी अशीच परिस्थिती राहिलेली तर सामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरुन देखील विश्वास उडेल, नक्की हे कार्यालय कोणासाठी आहे..? असा प्रश्न तालुक्यातील सामान्य नागरिकांना पडला आहे.
सुमन रामदास बागडे,
शेतकरी