कर्जतचा नेपाळ होणार!

पाचहून अधिक नियोजित धरणांमुळे महाप्रलयाचा धोका; ब्लास्टिंग आणि भौगोलिक रचनेमुळे पर्यावरणीय संकट

| नेरळ | प्रतिनिधी |

एका बाजूला सह्याद्रीचे डोंगर फोडायचे, दुसऱ्या बाजूला मोठमोठी धरणे उभारायची आणि डोंगरांच्या पायथ्याशी वसलेल्या कर्जतला संभाव्य संकटाच्या छायेत ढकलायचे, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. टोरंटच्या दोन धरणांसह शिलार, पोशीर, टाटा आणि कोंढाणे अशा विविध धरण प्रकल्पांचा विळखा कर्जत तालुक्याला पडत आहे. डोंगरांमधील ब्लास्टिंग, धरणांमधील प्रचंड पाणीसाठा आणि कर्जतची सखल भौगोलिक रचना लक्षात घेता भविष्यात नेपाळ किंवा केदारनाथसारख्या महाप्रलयाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

कर्जत शहर तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या सखल भागात वसलेले आहे. डोंगरमाथ्यावर धरणे आणि खाली गाव-वस्त्या अशी भौगोलिक रचना आहे. धरणांसाठी सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग झाल्यास डोंगरांच्या नैसर्गिक रचनेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात धरणांमधील प्रचंड पाणीसाठ्याचा जमिनीवर येणारा दाब आणि भूगर्भीय हालचाली यांचा संभाव्य परिणामही गांभीर्याने तपासण्याची गरज आहे.

भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यात धरणाला तडे गेले किंवा धरणफुटी झाली, तर वरच्या भागातील लाखो घनमीटर पाणी वेगाने खाली येऊ शकते. कर्जतचा सखल भाग, डोंगरांच्या पायथ्याशी असलेली गावे आणि शहरातील वस्ती यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेपाळ आणि केदारनाथ येथील आपत्तींचे उदाहरण देत पर्यावरणप्रेमी या संभाव्य धोक्याकडे लक्ष वेधत आहेत.

विशेष म्हणजे, हा धोका केवळ एका गावापुरता किंवा एका वाडीपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण तालुक्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धरणांची उभारणी, डोंगरांमधील ब्लास्टिंग आणि त्याचे पर्यावरणीय परिणाम यांचा स्वतंत्र व शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली कर्जतच्या नैसर्गिक रचनेशी किती मोठा हस्तक्षेप केला जात आहे, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. भविष्यातील पिढ्यांचे अस्तित्व आणि कर्जतची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, यासाठी सर्व धरण प्रकल्पांच्या संभाव्य परिणामांचा फेरआढावा घ्यावा आणि टोरंटच्या प्रस्तावित प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कर्जतकरांनी एकजुटीने भूमिका घ्यावी, असे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जात आहे.

धरणे...
शिलार, पोशीर, कोंढाणे, टाटा, टोरंट 1, टोरंट 2
Exit mobile version