वीज समस्यांनी कर्जतकर बेजार

समस्या न सोडविल्यास आंदोलन छेडू; संघर्ष समितीकडून महावितरणला अल्टिमेटम

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील वीज समस्यांनी ग्राहक बेजार झाले आहेत. ग्राहकांच्या वीज समस्यांबाबत कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. वीज समस्या सोडविण्यासाठी महावितरण कंपनीला अल्टिमेटम देण्यात आला असून वीज ग्राहक संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, वीज ग्राहकांची कोणतीही परवानगी न घेता स्मार्ट मीटर लावल्यास त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, ऑनलाइन काम करणारे युवक, उद्योजक, फार्म हाऊस व्यावसायिक इत्यादींचे मोठे नुकसान होत आहे. विजेवरील उपकरणे खराब होत असून आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत शनिवारी (दि.9) कर्जत महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत वीज ग्राहक संघर्ष समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विजेची कामे तात्काळ पूर्ण करावीत, तसेच उत्सव काळात 24 तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, स्मार्ट मीटर ग्राहकांच्या सहमतीशिवाय बसवू नयेत. प्रलंबित वीज समस्यांचे तातडीने निराकरण करावे. लाईट बिल वेळेवर देण्यात यावे. ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात. कर्जत शहराला 24 तास सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी एक्स्प्रेस फिडर सुरु करणे. तसेच, याकामी पोल टाकताना योग्य ती खबरदारी घ्यावी, इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. जर असे झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही संघर्ष समीती कडून करण्यात आला आहे.

महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद
या बैठकीत चंद्रकांत केंद्रे यांनी निवेदनाची तातडीने दखल घेत, ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही, असे आश्वासन दिले. यावेळी ठेकेदारास फोन करून संबंधित सूचना दिल्या. तसेच, चौक इनकमर 8 दिवसांत सुरू करण्यात येईल. कर्जत शहराला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी एक्स्प्रेस फीडरचे काम त्वरीत पूर्ण करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. त्याचबरोबर गणपती उत्सवात 24 तास अखंड वीज पुरवठा होईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
Exit mobile version