कर्जतकर धावले ‌शिक्षणासाठी

लाईट ऑफ लाईफच्या संकल्पनेतून मॅरेथॉन स्पर्धा


नेरळ, प्रतिनिधी


लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माध्यमातून रविवारी कर्जत शहरामध्ये ‌‘एक धाव शिक्षणासाठी’ या संकल्पनेवर आधारित भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. रॉयल गार्डन येथून सकाळी आठ वाजता या मॅरेथॉनला विली डॉक्टर तसेच कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.कर्जत येथील हॉटेल रॉयल गार्डन ते आमराई श्रीराम पूल अशी सुरभी ज्वेलर्स ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, कर्जत नगर परिषद ते अभिनव शाळा येथून पुन्हा रॉयल गार्डन पर्यंत ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये सुमारे 700 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्ज्वलन करून करण्यात आले. यावेळी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या संस्थापिका विली डॉक्टर, ट्रस्टच्या कमल दमानिया, कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेवक बळवंत घुमरे, संकेत भासे, माजी नगरसेवक संतोष पाटील, सार्वजनिक कार्यकर्ते राजाभाऊ कोठारी, हरिश्चंद्र यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे सुधीरकुमार गजभिये यांनी केले. या मॅरेथॉन मधून 1000 माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती उंचावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत होणार आहे.
यावेळी अध्यक्षा डॉक्टर विली यांनी मार्गदर्शन करताना भारतातच नव्हे, तर न्यूझीलंड, अमेरिकासारख्या देशांमध्येसुद्धा लाईफ ऑफ लाईफ ट्रस्टने वास्तविक स्वरूपाच्या मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. एक धाव शिक्षणासाठी ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याचे आवर्जून सांगितले.

Exit mobile version