| श्रीवर्धन | वार्ताहर |
कोकण मराठी साहित्य परिषद, श्रीवर्धन शाखेच्यावतीने रविवार, दि.22 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते सायं. 4.30 दरम्यान दिलीप पळधे यांच्या निवासस्थानी जिल्हास्तरीय निमंत्रित कवींचे कविसंमेलन व गझल मुशायरा या साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोमसापचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ हे कार्यक्रमाचे उद्घाटक असून, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रायगडभूषण प्रा. एल.बी. पाटील, जिल्हा समन्वयक अ.वि.जंगम, सार्वजनिक वाचनालय, श्रीवर्धनचे अध्यक्ष मनोज गोगटे हे मान्यवर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कविसंमेलनाचे अध्यक्षपद संजय गुंजाळ भूषविणार असून, गझल मुशायरा कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्योत्स्ना राजपूत भूषविणार आहेत. या दर्जेदार साहित्यिक कार्यक्रमाचा लाभ सर्व कविताप्रेमी, गझलप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन कोमसाप, श्रीवर्धन शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.