केशव खरिवले यांच्या कलिंगडांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ
| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील सांगडे गावचे कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून सर्वपरिचित असणारे केशव खरिवले यांच्या कलिंगड पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली असून, त्यांनी पिकविलेली कलिंगडे थेट दुबईला रवाना झाली आहेत.
शेती क्षेत्रात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणारे केशव खरिवले यांनी या वर्षीच्या शेतीच्या हंगामात तालुक्यातील घोसाळे येथे कलिंगड पिकाची शेती करून व विकसित बियाण्याचा वापर करून नवा प्रयोग केला. त्यांच्या या प्रयोगास चांगले यश मिळून कलिंगड पिकाचे उत्पादनही चांगले आले. याशिवाय फळेही आकाराने मोठी आली. कलिंगड पिकाचा दर्जा व मोठे फळ आल्याने मुंबईमधील येथील काही कलिंगड फळ विक्रेते व्यापार्यांनी खरिवले यांच्या शेतीतील कलिंगडे खरेदी करणे पसंत केले. मुंबईतील व्यापार्यांनी दुबईतील व्यापार्यांशी संपर्क साधला असता दुबईतील व्यापार्यांनाही कलिंगडे पसंतीस उतरल्याने खरिवले यांच्या शेतात पिकलेल्या सर्व कलिंगड पिकाला मागणी वाढली आहे. सर्वच पिकलेला माल खरेदी करून खरिवले यांच्या कलिंगडास थेट दुबईची बाजारपेठ उपलब्ध करून दिली.