| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणची राजधानी तेहरानवर अनेक भीषण हल्ले केले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रतिहल्ले केले असून युद्धाचा भडका उडाला आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिका आणि इस्रायलने केला आहे. इराणच्या वृत्तवाहिन्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-अमेरिका संयुक्त कारवाईत खामेनी ठार झाल्याचा दावा केला होता. अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच, अनुभवी धर्मगुरू आणि खामेनी यांचे जवळचे सहकारी अयातुल्ला अलीरेजा अराफी यांना तात्पुरते इराणचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच, खामेनी यांच्या ‘शहादती’च्या स्मरणार्थ इराणने 40 दिवसांचा सार्वजनिक शोक आणि सात दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
इराणच्या धर्माधिष्ठित (थिओक्रॅटिक) व्यवस्थेत सर्वोच्च नेता हे देशातील सर्वात प्रभावशाली पद आहे. राष्ट्रपती, संसद आणि न्यायपालिका यांच्याही वर त्याचे स्थान असते. खामेनी यांच्याकडे सशस्त्र दलांचे सर्वोच्च नियंत्रण होते. न्यायव्यवस्थेचे प्रमुख, राज्य नियंत्रित माध्यमांचे प्रमुख तसेच महत्त्वाच्या सुरक्षा संस्थांचे प्रमुख नेमण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता. निवडून आलेल्या अधिकाऱ्यांना पदच्युत करणे, संसदेकडून मंजूर केलेले कायदे रोखणे किंवा बदलणे, तसेच युद्ध किंवा शांततेची घोषणा करणे यांसारखे निर्णायक अधिकार त्यांच्या हातात होते. त्यांचे नियंत्रण परराष्ट्र आणि लष्करी धोरणांपर्यंत विस्तारलेले होते. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कोअर आणि त्याची परदेशी कारवाया पाहणारी कुद्स फोर्स यांच्या माध्यमातून इराणच्या प्रादेशिक धोरणांवर त्यांचा प्रभाव राहिला.
अमेरिका, इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू
