| पनवेल | प्रतिनिधी।
खांदा वसाहत सेक्टर-2 येथील खांदेश्वर सरोवर वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे सुकण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर घटल्याने सरोवराच्या विविध भागांमध्ये चिखल आणि उघडा तळ दिसू लागला आहे. परिणामी, सरोवरातील कासवेही मोठ्या संख्येने एका बाजूला एकत्र येताना नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत.
खांदेश्वर सरोवर हे परिसरातील महत्त्वाचे जलस्रोत मानले जाते. दरवर्षी गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवादरम्यान लहान-मोठ्या मूर्तींचे विसर्जन येथे केले जाते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विसर्जनामुळे सरोवराच्या तळामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरोवराची खोली कमी झाली असून, पाणी साठवण्याची क्षमता घटली आहे.
सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सिडको प्रशासनाने तातडीने सरोवरातील गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. गाळ उपसा केल्यास सरोवराची खोली वाढेल आणि आगामी पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाणी साठवता येईल, असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे. या सरोवरात अनेक नागरिक मासेमारीसाठी ही येत असतात. अजून मान्सूनला सुमारे आठ ते दहा दिवसांचा अवधी असल्याने याच कालावधीत गाळ काढण्याचे काम सुरू केल्यास सरोवराचे संवर्धन होण्यास मदत होईल. खांदेश्वर सरोवराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
खांदेश्वर सरोवर सुकण्याच्या मार्गावर
