बेपत्ता महिलेचा खांदेश्वर पोलिसांनी लावला छडा

| पनवेल | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील 27 वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह गोवा येथे पिकनिकला गेली होती. दरम्यान, कलंगुट समुद्रकिनाऱ्यावरून ही महिला 18 मे रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर पतीने गोव्यातील कलंगुट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने गोवा पोलीस या महिलेचा शोध घेत होते. ही महिला पनवेल तालुक्यातील उसर्ली येथील रहिवासी असल्याने गोवा पोलिसांनी तपासाबाबत खांदेश्वर पोलिसांना विनंती केली. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासातच महिलेला शोधून काढले व नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

स्नेहा राज कांबळे, त्यांचे पती आणि कुटुंबातील इतर सदस्य गोव्याला कलंगुट समुद्रकिनारी गेले होते. यावेळी काही नातेवाईक समुद्रात पोहत असताना स्नेहा समुद्रकिनाऱ्यावरून बेपत्ता झाली होती. याबाबत बेपत्ता महिलचे पती राज व नातेवाईकांनी कलंगुट पोलिसात तक्रार दाखल केली होती. गोवा पोलिसांनी शोध सुरू केला असता स्नेहा कांबळे पुणे येथे असल्याबाबत गोवा पोलिसांना माहिती मिळाली. मात्र त्याठिकाणी बेपत्ता महिला सापडली नाही. स्नेहा कांबळे खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी असल्याने गोवा पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्याशी संपर्क साधत महिलेचा शोध घेण्यासाठी विनंती केली. त्यानुसार पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी गुरुवारी (दि.6) संध्याकाळी या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस अंमलदार भाऊराव बाचकर व सचिन सरगर यांना तात्काळ रवाना केले असता बेपत्ता महिलेला खांदेश्वर पोलिसांनी अवघ्या काही तासातच पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे परिसरातील मंत्रा सिटी रहिवासी इमारतीतून शोधून काढले. याबाबत गोवा पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांचे आभार मानले. याबाबत अधिक तपास खांदेश्वर पोलिस करत आहेत.

Exit mobile version