तळीराम वाढल्याने चिंता, महिनाभरात ८० लाखांची मद्यविक्री
। खारघर । प्रतिनिधी ।
नवी मुंबईसह पनवेल महापालिकेतील उच्चपदस्थ अधिकार्यांचे वास्तव्य असलेल्या खारघर परिसरातील गावागावांमधून महागड्या दारूची मोठ्या प्रमाणात शहरात विक्री सुरू आहे. महिनाभरात जवळपास 80 लाखांची मद्यविक्री झाली असून प्रशासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे नो लिकर झोन असलेल्या खारघरची लिकर झोनकडे वाटचाल सुरू आहे.
सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य खारघर शहरात चाळीसहून अधिक शाळा आणि काही महाविद्यालये असल्यामुळे शैक्षणिक नगरी म्हणून या शहराची ओळख आहे. त्यामुळे विविध सुविधांनी युक्त अशा या शहरात वास्तव्य करण्यास अनेकांकडून पसंती दिली जात आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विकासकामांमुळे या शहराचा विस्तार आता कोपरा, बेलपाडा, मुर्बी, रांजणपाडा, पेठ, ओवेगाव, पापडीचा पाडापर्यंत झाला आहे. या गावांमध्ये घरे भाड्याने घेऊन वास्तव्य करणार्या कामगारवर्गाची संख्या अधिक आहे. अशातच या वसाहतीत वास्तव्य करणार्यांकडून मद्याची मागणी होत असल्याने छुप्या पद्धतीने महागड्या दारूची विक्री सुरू आहे. खारघर शहराला लागून असलेल्या कोपरा, खारघर, बेलपाडा, मुर्बी, रांजणपाडा, पेठ, ओवेगाव, पापडीचा पाडा या गावांतूनही महागड्या दारूची विक्री होत असल्याने एकेकाळी ङ्गनो लिकर झोनफ असलेल्या खारघर शहराची ओळख लिकर झोनकडे होत आहे.
किरकोळ मारामारीच्या घटना
अवैध मद्य विक्रेत्याच्या बाजूला काहींनी चायनीज, तर काही ठिकाणी चणा, मूगडाळ, उकडलेली अंडी विक्रीचे स्टाल सुरू केले आहेत. अनेकदा या ठिकाणी किरकोळ मारामारीच्या घटना घडल्याचे नागरिक सांगतात. तसेच विक्रेत्यांकडून विविध यंत्रणांना हप्तेही दिले जात असल्यामुळे विक्री होणारी दारू देखील बनावट आणि आरोग्यास अधिक घातक ठरण्याची शक्यता आहे.
२००७ सालापासून मद्यविक्रीला विरोध
खारघर सेक्टर वीस जलवायू बस थांबा शेजारी २००७ साली वाईन विक्रीचे दुकान सुरू झाल्यावर खारघरमधील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मोर्चा, आंदोलन करून प्रखर विरोध केला होता. यावेळी खारघर ग्रामपंचायतीने वाईन शॉप बंदचा ठराव केला; तर नागरिकांचा वाढता रोष पाहून रायगड जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनाही मद्याची दुकाने बंद करावी लागली होती.
ग्राहकांची गैरसोय टाळण्याचे नियोजन
ग्राहकांना सोयीचे व्हावे, यासाठी काही विक्रेते घरासमोर अथवा काही अंतरावर उभे असतात. ग्राहकांच्या मागणीनुसार प्लास्टिक पिशवीत दारू आणून देतात. बहुतांश विक्रेत्यांचे मोबाईल नंबर ग्राहकांकडे आहेत. संपर्क केल्यास गावाच्या कडेला उभे असलेल्या ग्राहकापर्यंत दारू पोहच केली जाते. यासाठी पनवेल येथून मद्य खरेदी करून रिक्षाने अथवा खासगी वाहनातून ते आणले जाते.
खारघरमध्ये यापूर्वी अनेक वेळा कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच बेकायदा दारू विक्रीची माहिती प्राप्त होताच कारवाई केली जाते.
– प्रमोद कांबळे, वरिष्ठ अधिकारी, उत्पादन शुल्क
खारघर परिसरात मद्यविक्री होत असेल तर स्वतंत्रपणे अशा दारू विक्रेत्यांवर परिमंडळ दोनच्या माध्यमातून कारवाई केली जाईल.
– शिवराज पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन