खेड – कशेडी घाटात एसटीची डंपरला धडक; 21 प्रवासी जखमी

खेड | प्रतिनिधी |

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात डंपरला एसटीची धडक बसून झालेल्या अपघातात 21 प्रवाशी जखमी झाले आहेत. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ब्रेक मारल्यावर एसटी स्लिप झाल्याने समोरून येणाऱ्या डंपरवर आदळली, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. जखमींना नरेंद्र महाराज संस्थान रुग्णवाहिका, 108 आणि खेड येथील मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी येथून रत्नागिरी येथे प्रवाशी घेऊन निघालेले एसटी महामंडळाची एमएच-20-बीएल-2459 या क्रमांकाची बस दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात आली असता एका वळणावर चालकाने अचानक मारलेल्या ब्रेकमुळे गाडी स्लिप होवून चिपळूण कडून महाडकडे जाणाऱ्या डंपरवर आदळली. या अपघातात एसटी बसचे चालक, वाहक तसेच अन्य प्रवाशी असे 21 जण जखमी झाले.

अपघाताची बातमी मिळताच कशेडी टॅप वाहतूक पोलीस, महामार्ग मृत्युंजय दुत टिमचे सर्व सदस्य तसेच खेड येथील मदत ग्रुपचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना बसमधून बाहेर काढून नरेंद्र महाराज संस्थान रुग्णवाहिका, 108 आणि खेड येथील मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खेड पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version