अपहरण केलेल्या ‘त्या’ बालकाची 12 तासाच्या आत सुटका

। पनवेल । वार्ताहर ।
दोन वर्षाच्या अल्पवयीन अपहृत बालकाची पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 12 तासाच्या आत सुटका केल्याने तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे. तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि जितेंद्र सोनावणे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रविंद्र दौडकर यांना कळविले की, त्यांचे पोलीस ठाणे नेमणुकीतील पो.शि. संदेश उत्तेकर यांना खबर मिळाली आहे की, एका महिलेने अल्पवयीन बालकास अपहरण करुन त्यास भिंगारवाडी, ता. पनवेल येथे लपवुन ठेवले आहे. सदर माहीतीवरुन सदर पथकाने तांत्रिक तपास करुन महिलेस ताब्यात घेतले व तिच्याकडे अपहृत बालकाबाबत चौकशी केली असता तिने अपहृत मुल स्वत:च्या घरात लपवुन ठेवल्याचे सांगितले. तात्काळ मपोशि घरत हिच्या मदतीने अल्पवयीन मुलगा वय अंदाजे 2 वर्षे यास ताब्यात घेवून त्याची यशस्वीरित्या सुखरूप सुटका केली. तसेच महिला आरोपी शेवंता एकनाथ कातकरी (वय 30, राहणार कातकरवाडी, वाजेपुर) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


ही यशस्वी कामगीरी पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग भागवत सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली रविंद्र दौडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका पोलीस ठाणे, जितेंद्र सोनावणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरिक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, पोलीस नाईक पंकज चंदिले, प्रकाश मेहेर, विकास साळव, जयदिप पवार,वैभव शिंदे, पोलीस शिपाई संदेश उत्तेकर भिंगारवाडीचे पोलीस पाटील संतोष गायकर पथकाने केली. या गुन्हयाचा पुढील तपास पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण पाडवी करीत आहेत.

Exit mobile version